सातपुड्याच्या दुर्गम भागातील बालमृत्यू रोखण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोबाईल युनिट
नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यातील सातपुड्याचा दुर्गम भागात बालमृत्यू आणि कुपोषण मोठ्या प्रमाणात असून, या भागात आरोग्य सुविधा पोहोचत नसल्याने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अतिदुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी दोन मोबाईल मेडिकल युनिट (फिरते रुग्णालय सेवा) च्या वाहनाचा शुभारंभ खासदार डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते करण्यात आला.
या मोबाईल युनिट वाहनामार्फत दुर्गम भागात ज्या ठिकाणी आरोग्य सेवा पोहचत नाही अशा ठिकाणी ह्या मोबाईल युनिटच्या मार्फत रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी, ० ते ६ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी, गरोदर व स्तनदामाता तपासणी, साथजन्य परिस्थितीतील उपचार, सिकलसेल, ॲनेमिया, रक्त, लघवी तपासणी तसेच आरोग्य विषयक समुपदेशन व उपचार या मोबाईल युनिटच्या मार्फत करण्यात येणार आहे. तसेच तपासणी करतांना जोखीमग्रस्त रुग्ण आढळून आल्यास त्यांना त्वरीत पुढील उपचारासाठी आरोग्य केंद्र किंवा उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे. या मोबाईल युनिट वाहनात एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारीका, एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक फॉर्मासिस्ट, वाहनचालक असे कर्मचारी वर्ग या युनिटमध्ये राहणार असून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे.