नंदुरबार (आफताब खान) – नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 36 तासापासून पावसाची सतत धार सुरू असून नदी नाल्यांना पूर आले आहेत. पुराने काही गावांचा संपर्क तुटला आहे, तर अनेक गावात पुरांचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील वरखेडी, देहलि, आणि देव नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पूरस्थिती निर्माण झाली आहे.
नवापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे . मात्र गेल्या 24 तासात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात 65 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे . जिल्ह्यातील परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाच्यावतीने आपत्ती व्यवस्थापन पथके तहसील कार्यालयांना सज्ज ठेवण्यात आली आहेत. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये उगम पावणाऱ्या नद्यांच्या उगम स्थळावर चांगला पाऊस होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणत वाढ होत असून, धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी नदी काठावरील गावांना ही सावधानतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.