मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक गावाच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असून, ह्या गावात शनिवारला आठवडी बाजार भरत असतो. या बाजारातून दिनांक ८ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान अंबादास मुख्यदल व इतरांचे शनिवारच्या आठवडी बाजारात एक ते दोन मोबाईल चोरीला गेले आहेत. मेरा बुद्रूक बीटचे जमादार श्री.शिरसाट यांच्या कार्यकाळात मोबाईल चोरीचे प्रमाण बंद झाले होते, त्यांनी चोरांवर दाखवलेला खाकी बाणा पाहाता, त्यामुळे चोरांची हिंमत होत नसे, पण आता आलेले नवे बीट जमादार श्री देठे यांच्या कार्यकाळात मात्र मोबाईल चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, हे चोरटे देठे यांच्या नाकावर टिच्चून लोकांना भरदिवसा लुबाडत असल्याने पोलिसांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मेरा बीटचे जमादार अच्युतराव शिरसाट यांची बदली झाली, त्यांच्या जागी श्री.देठे हे बीट जमादार आलेत. त्यांच्या कार्यकाळात आठवडी बाजारात मोबाईलचोर पुन्हा सक्रिय झाले असून, पोलिसांचा कोणताही वचक सध्या तरी त्यांच्यावर दिसून येत नाही. तरी सर्व सामान्यातून चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. बाजारात भाजीपाला खरेदी करताना किंवा पैसे देतानाची संधी साधून चोरटे मोबाईल लंपास करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना भुर्दंड आणि त्रास सहन करावा लागतोय. यापूर्वीही अनेकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. या बाबत पोलिसांत तक्रारदेखील दिली. मेरा बुद्रुक आठवडी बाजारात आजूबाजूच्या गावातील शेतकरी भाजीपाला, कृषी उत्पादने विक्रीसाठी आणतात. ताजी आणि चांगला भाजीपाला माफक दरात मिळतो म्हणून शेजारील गावातील नागरिक येथे खरेदीसाठी येतात, आणि आपला मोबाईल फोन हरवून बसतात. त्यामुळे नागरिकांना स्वस्तातला भाजीपाला खरेदीच्या नादात मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय. पोलिसांनी या आठवडी बाजारातील मोबाईल चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.