– परिसरात तीव्र संताप व्यक्त, तातडीने आरोपीस अटक करण्याची मागणी!
मेहकर (रवींद्र सुरूशे) – तालुक्यातील देऊळगाव माळी येथील तरूण शेतकरी पांडुरंग रामदास मगर (वय २५) या शेतकर्याने शेतामध्ये मागील तीन वर्षांपासून मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामध्ये १२५ पेट्यांद्वारे किमान दोन लाखांपेक्षा जास्त मधमाशा त्यांनी पाळल्या असून, त्यांचा हा व्यवसाय त्यांच्यासाठी मोठे अर्थाजनाचे साधन तर ठरलेच, परंतु इतर शेतकर्यांनाही आदर्श ठरला आहे. परंतु, देऊळगावमाळी किंवा परिसरातील कुणातरी विघ्नसंतोषी नराधमाने या मधमाशांना विषारी औषध देऊन मारल्याने पांडुरंग मगर यांच्यावर मोठे आर्थिक संकट तर कोसळलेच, परंतु दोन लाखांपेक्षा जास्त मधमाशांचा या भयानक प्रकारात मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी तातडीने या नराधमाचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची मागणी परिसरातील सर्व शेतकरी करत आहेत.
मधुमक्षिका पालनाच्या एका पेटीमध्ये साधारणतः वीस हजारापेक्षा जास्त मधमाशा असतात. अशा १२५ पेट्यांमधून दोन लाखांपेक्षाजास्त मधमाशांचे पालन शेतकरी पांडुरंग मगर हे करत होते. परंतु, देऊळगाव माळी व परिसरातील कोणीतरी अज्ञात नराधम व्यक्तीने विषारी औषध (ALUMINIUM PHOSPHIDE 56% Powder CELPHOS) शुध्दभार १० ग्राम या विषारी औषधाच्या १५ ते २० पुड्या आणून १२५ पेट्यांमध्ये ते विषारी औषध टाकले. त्यामुळे त्या प्रत्येक पेटीत असलेल्या मधमाशा तडफडून मृत्युमुखी पडल्यात. या विघ्नसंतोषी प्रवृत्तीमुळे तरुण शेतकरी पांडुरंग रामदास मगर यांचे दहा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. मगर यांच्या मधुमक्षिका पालनातून दोन टनांपेक्षा जास्त मध जमा झालेला होता. वरील घटनेचा मेहकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या तरुण शेतकर्याला शासनाने तात्काळ मदत देऊन, पुन्हा हा मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय सुरू करण्यास सहकार्य करावे, अशी मागणी होत आहे. त्यासोबतच हे कृत्य ज्या अज्ञात नराधमाने केले त्याचा तात्काळ शोध घेऊन संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.
निष्पान जीव तडफडून मारले, त्याच्या लेकराबाळांनाही तसेच मरण येईल…!
या घटनेने परिसरातील शेतकरी इतका संताप व्यक्त करत आहेत, की ज्या अज्ञात नराधमाने विष घालून निष्पाप मधमाशा त्यांच्या चिल्ल्यापिल्ल्यांसह तडफडून मारल्या, त्या पापाबद्दल देवदेखील त्याच्यासह त्याच्या लेकराबाळांनाही असेच तडफडून मरण देव देईल, असा शाप परिसरातील शेतकरी खासगीत बोलताना देत आहेत. तब्बल दोन लाखापेक्षा जास्त मधमाशांना विष घालून मारण्याचे पाप मोठे असून, हा विघ्नसंतोषी कायद्याच्या कारवाईतून सुटला तरी देव त्याला त्याच्या पापाची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही, अशा शिव्याशापही या परिसरातील महिला व शेतकरी आपला संताप व्यक्त करताना देत आहे.