Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

देवेंद्र फडणवीस लवकरच राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री?

UPDATE

  • आज सकाळी अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली. यामध्ये सुनिल तटकरे हे अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार हे अधिकृत पत्र काढून त्याबाबत घोषणा करतील, असे सांगण्यात आले आहे.
  • दुसरीकडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ९ आमदारांवर अपात्रतेची याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे. तसेच या बंडानंतर पक्षातील राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येणार आहेत. या प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅट देखील पक्षाकडून जाहीर करण्यात आला आहे.
  • संपूर्ण नाट्यमय घडामोडी घडत असताना अजित पवार यांना पहिला धक्का मिळाला आहे. काल अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले खासदार अमोल कोल्हे यांनी बाप विसरायचा नाही म्हणत… मी साहेबांसोबत असल्याचे जाहीर केले आहे. ट्वीट करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवारांनी आक्रमक पवित्रा घेताच ९-१० आमदारांनी पवित्रा बदलला घेतला आहे.
  • पारनेरचे आमदार निलेश लंके, चिपळूणचे आमदार शेखर निकम, शिरुरचे अशोक पवार, वसमतचे राजू नवघरे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, अकोलेचे आमदार किरण लहामटे, पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. कालपर्यंत अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांची भाषा अचानक बदलली आहे. आपण अजित पवारांसोबत नाही, शरद पवारांसोबत आहोत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतलेली नाही. मात्र कालपर्यंत अजित पवारांसोबत असलेले आमदार आता तटस्थ भूमिकेत आहेत. तर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल झाले आहेत. गेल्या २ वर्षांत नॉट रिचेबल होण्याची ही त्यांची चौथी वेळ आहे. शहापूरचे आमदार दौलत दरोडा काल अजित पवारांसोबत उपस्थित होते. मात्र आज त्यांनी थेट शरद पवारांच्या समर्थनाची भूमिका घेतली आहे.

– प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांकडून अजित पवारांसह ९ वरिष्ठ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका
– ‘पुन्हा नव्या जोमाने उभे राहू’, 82 वर्षाच्या तरूणाने कराडमधून बंडखोरांना ललकारले!

मुंबई/कराड (प्राची कुलकर्णी) – ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरण्याच्या भीतीनेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांचा तातडीने मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. अजितदादांच्या बंडखोरीमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच चाणक्यनीती असून, हा सर्व घटनाक्रम २८ जून ते १ जुलै या कालावधीत अतिशय वेगाने घडला. लवकरच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच दिसतील’, अशी महत्वपूर्ण माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ला दिली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज गुरूपौर्णिमेनिमित्त आपले राजकीय गुरू स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी गेले असून, यशवंतरावांच्या समाधीदर्शनानंतर पुन्हा एकदा नव्याने पक्ष उभारण्याची घोषणा केली आहे. ‘महाराष्ट्रात भाजपची पक्ष फोडण्याची रणनीती व जातीयवादाचे राजकारण चालणार नाही, राज्यातील जनता एकजुटीने या जातीयवादी शक्तिंचा पराभव करेल’, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेणार्‍या आठ आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी याचिका विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीने निर्णय घेण्याची मागणीदेखील त्यांनी केल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यात आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. तत्पूर्वी अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांची बैठक घेऊन चर्चा केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवार हे गुरूपौर्णिमेच्या मुहुर्तावर सातारा जिल्ह्यातील कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पोहोचले. त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी आदरांजली अर्पण केल्यानंतर, पुन्हा एकदा नव्याने पक्ष बांधण्याची घोषणा केली. भाजपवर टीका करताना ते म्हणाले, की ‘लोकनियुक्त सरकार पाडण्याचे पाप देशभर भाजप करत आहे. महाराष्ट्रातदेखील असे झाले आहे. अशा जातीयवादी शक्तिंना पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने एकजूट झाले पाहिजेत. महाराष्ट्रात जातीयवादी व फुटीरवादी राजकारण चालणार नाही. त्याविरोधात आपण पुन्हा एकदा संघर्ष उभा करू. येत्या ५ तारखेला पक्षाची बैठक बोलावली असून, या बैठकीत पुढील निर्णय घेऊ’, असेही पवारांनी ठणकावले. यावेळी कराड येथे मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन पहायला मिळाले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांंनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व निवडणूक आयोगाला पत्र लिहून अजित पवार यांच्यासह आठ आमदारांच्या अपात्रतेची मागणी केली आहे. तसेच, शरद पवार हे पक्षाध्यक्ष असून, पक्षाचे सर्वाधिकार त्यांच्याकडे आहेत. पक्षासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यांची बाजू ऐकण्यात यावी, अशी विनंतीही जयंत पाटील यांनी केली आहे. जयंत पाटलांच्या या कारवाईनंतर अजित पवार यांनी तातडीने आपल्या मंत्र्यांसह समर्थक आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर अजित पवार, छगन भुजबळ व दिलीप वळसे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे या चार नेत्यांत प्रदीर्घकाळ बैठक सुरू होती. या बैठकीत पुढील रणनीती निश्चित करण्यात आली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांची धुसफूस बरीच वर्षाआधीची असली तरी, पक्षात बंडखोरीचा निर्णय त्यांनी अवघ्या दोन दिवसांत घेतला. ३० जूनला अजित पवार यांची दिल्लीत अमित शाह यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी १ तारखेला आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. तर २ तारखेला त्यांनी मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडींची एकनाथ शिंदे यांना पुसटशीही कल्पना नव्हती, अशी माहितीही राजकीय सूत्र देत आहेत. अजित पवारांच्या मंत्रिमंडळात येण्याने शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून, त्यांची ‘बार्गेनिंग पावर’ कमी झाली आहे. तसेच, मंत्रिमंडळात शिंदे गटाला पुरेसे प्रतिनिधीत्व मिळण्याची आशादेखील आता मावळली आहे. सद्या तरी अजित पवारांसोबत आठच मंत्री असून, त्यांच्या समर्थनार्थ सहा आमदार खुलेपणाने पुढे आले आहेत. तर इतर आमदार हे तळ्यातमळ्यात आहेत. अजूनही काही आमदारांना या बंडाचे नेमके वास्तव लक्षात येत नसून, या बंडाला शरद पवारांचा आतून पाठिंबा आहे किंवा नाही? हे अनेकांच्या लक्षात यायला तयार नाही. त्यामुळे ते दोन्ही बाजूने आपली सकारात्मक भूमिका मांडत आहेत. जयंत पाटलांचा फोन आला तर ते ”आम्ही मोठ्या साहेबांसोबत आहोत”, असे सांगत आहेत; तर अजितदादांचा फोन आला तर ”दादा आम्ही तुमच्याकडेच आहोत”, असे सांगत आहेत. त्यामुळे आमदार नेमके कुणाकडे किती आहेत? याचा आकडा काही स्पष्ट व्हायला तयार नाही.
—————–

https://breakingmaharashtra.in/ncp_spilt/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!