ChikhaliHead linesVidharbha

चिखली आगार व्यवस्थापकांचा गलथान कारभार; विद्यार्थ्यांचे बसअभावी हाल, जीवघेणा प्रवास!

– जादा बस सोडा, साखरखेर्डा मुक्कामी बस पुन्हा सुरू करण्याची मागणी ऐरणीवर!

मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – चिखली आगार व्यवस्थापकांच्या गलथान कारभारामुळे मेरा बुद्रूक, अंत्री खेडेकर गुंजाळा, चंदनापूर आदी गावांतील विद्यार्थ्यांची बसअभावी मोठी गैरसोय सुरू असून, शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थिनींची मोठी कुचंबणा व शैक्षणिक नुकसान होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने या बसेसमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींना जागाच मिळत नाही. एका बसची क्षमता ५५ प्रवाशांची असताना गुरेढोरे कोंबावीत तसे १००पेक्षा जास्त प्रवासी कोंबून भरले जात आहेत. तसेच, या बसदेखील थांब्यावर नीट थांबत नाहीत. कधी लांबवर पुढे तर कधी लांबवर मागे थांबतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसमागे पळापळ करावी लागते. तरी, चिखली आगार व्यवस्थापकांनी या मार्गावर सकाळी व सायंकाळी जास्तीत जास्त बसेस सोडाव्यात. तसेच, साखरखेर्डा मुक्कामी बस पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी व ग्रामस्थ करत आहेत. चिखली आगार व्यवस्थापकांनी आपला कारभार सुधारला नाही तर सर्व विद्यार्थी हे चिखली आगारावर धडक देणार आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणार्‍या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष सवलती जाहीर करण्यात आल्यापासून या सवलतीमुळे प्रवासी संख्या वाढली असली तरी, बसमधून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांचा प्रवास होताना दिसून येत आहे. तर अनेक बसेस बसथांबा असतानासुद्धा न थांबता सुसाट पुढे निघून जात असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक फाटा येथे दिनांक २ जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास बसमधून सुमारे शंभरहून अधिक प्रवासी व शाळकरी मुळे आपला जीव मुठीत धरून प्रवास करत असल्याचे दिसून आले. सकाळी शाळकरी मुलांची वर्दळ शाळेत जाण्यासाठी व प्रवाशांची तालुक्याचे ठिकाणी जाण्यासाठी असते. त्यामुळे चिखली – बिबी बसगाडी, चिखली – साखरखेर्डा, मेरा बुद्रूकमार्गे धावत असणार्‍या बसगाड्यांतून अपुर्‍या बसेसमुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होताना दिसत आहे. मेरा बुद्रूक फाट्यावर अनेक प्रवासी व शाळकरी मुले बसच्या प्रतीक्षेत असताना येणार्‍या बसेस क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. काही बसेस तर नियमित थांबा असणार्‍या जागा सोडून १०० ते २०० मीटर अंतरावर थांबत असल्याचेही दिसून आले. त्यामुळे अनेक प्रवासी त्या एसटी बसच्या पाठीमागे धावत असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने शाळकरी मुलांशी संवाद साधला असता, सकाळी दोन व सायंकाळी दोन बसेस वेळेवर सोडण्यात याव्यात, व चिखली – साखरखेर्डा मुक्कामी असणारी बस पुन्हा चालू करावी, अशी मागणी शाळकरी मुला, मुलींनी केली आहे.

मेरा बुद्रूक, मनुबाई, गुंजाळा, चंदनपूर, अंत्री खेडेकर या परिसरातील शाळकरी मुलांची संख्या जास्त प्रमाणात असून, परिसरातील शाळकरी मुले मेरा खुर्द, बेराळा, चिखली या ठिकाणच्या शाळेमध्ये शिकतात. ही मुले-मुली एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करतात. मात्र चिखली आगाराचे चुकीचे व्यवस्थापन असल्याने व बसेसअभावी या परिसरातील विद्यार्थ्यांना गुरेढोरे कोंबावीत तसे कोंबून प्रवास करावा लागत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणे म्हणजे महामंडळाकडून आरटीओच्या नियमाची खुलेआम पायमल्ली आहे. तसेच, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाला धोकादेखील आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीचा विचार करून चिखली आकाराने चिखली-अंत्री खेडेकर, मेरा बुद्रूकमार्गे जास्तीत जास्त बसेस सोडणे आवश्यक आहे. भविष्यात अशा क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणार्‍या बसेसचा अपघात नाकारता येणार नाही. तरी चिखली आगाराने तातडीने संबंधित प्रकाराकडे लक्ष देऊन शाळाकरी मुलांच्या हिताचा विचार करून या परिसरात जास्त बसेस सोडाव्यात, जेणेकरून एका बसला क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणे टाळता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!