बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी धास्तावला असून, पेरण्या खोळंबल्या आहेत. कपाशीची लागवड थांबली असून, सोयाबीन, तूर पेरणीला सुरूवात झाली होती. परंतु, पावसाअभावी बिबी मंडळात या पेरण्या रखडून पडल्या आहेत. हवामान खाते व पंजाबराव डख हे दोघेही पावसाचा अंदाज वर्तवित असले तरी आभाळातले ढग कोरडे जात असल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी येलो अॅलर्ट देण्यात आला आहे. मात्र बिबी मंडळात अजून पेरणीयोग्य पाऊस पडलेला नसल्यामुळे चालू झालेल्या पेरण्या शेतकर्यांनी थांबविल्या आहेत. अनेक ठिकाणी पावसाने सुरुवात केली, मात्र पेरणीयोग्य समाधानकारक, पुरेसा पाऊस पडला नसला तरी, काही शेतकर्यांनी कपाशी लागवडीला सुरुवात केली होती. तर काही शेतकर्यांनी सोयाबीन, तूर पेरणीला सुरुवात केली होती. मात्र पावसाने आठ दिवसांपासून अचानक खंड पाडला असून, ऊन तापू लागल्याने पेरणी केलेल्या शेतकर्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पेरलेले उगवते की नाही, याची चिंता वाटू लागली आहे, तर पेरणी राहिलेले शेतकरी पाऊस कधी पडतो, याची वाट पाहत आहेत. चोहीकडे ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राची चाके थांबल्याचे चित्र पहावयास मिळत असून, पाऊस नसल्यामुळे बिबी मंडळातील शेतकर्यांची चिंता वाढली आहे. पेरणी केलेल्या शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट येते की काय, असे भीतीचे वातावरणही शेतकर्यांत आहे. वातावरणातील बदलामुळे कधी ऊन तर कधी सावली, तर कधी ढग येऊन सुसाट हवा येत असल्यामुळे हवामान अंदाज पुढेपुढे सरकत चालला असल्याचे शेतकर्यांकडून बोलले जात आहे. तर काही भागात ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, असे शेतकरी पेरणी केलेल्या शेतात स्पिंकलरद्वारे पाणी देऊन आपली पिके जगविताना देत आहेत.
—————-