राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेकांच्या हकालपट्ट्या!
– काकाच्या पक्षाकडून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे बडतर्फ, अजित पवारांसह ९ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई
– दादाच्या पक्षाकडून जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी, सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून, एकमेकांच्या नेत्यांच्या हकालपट्ट्यांचा मोसम जोरात आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासह ९ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र दिल्यानंतर पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करत, सुनील तटकरे यांना नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले. तसेच, प्रदेश कार्यकारिणीतही नव्या नियुक्त्या केल्यात. तसेच, जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टीची घोषणा केली. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्रही दिले. या दोन्ही राजकीय कारवायांवरून खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, असा प्रश्न निर्माण झाला असून, पक्षाचे आमदार, नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्याकडेच असल्याचा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे खा. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी केली होती. या मागणीला शरद पवारांनी मंजुरी दिली असून, पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे. तसेच काल शपथ घेतलेल्या नऊ आमदारांवर पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात सुरूवात झाली. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मोठी खेळी करत, काका शरद पवारांना मोठा धक्का दिला. अजित पवार यांच्यासोबत आलेले राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करत, सुनील तटकरेंची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. यासोबतच अजित पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करताना अनिल पाटील हेच आमचे प्रतोद (व्हीप) असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार हे आमच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. आणि याची माहिती विधानसभा अध्यक्षांना कळवली आहे, असे प्रफुल पटेल पत्रकार परिषदेत म्हणाले. तसेच शरद पवार हे आमचे गुरू आहेत. आणि आमची हात जोडून त्यांना विनंती आहे, त्यांचे आशीर्वाद आम्हाला असावेत, असे आवाहन प्रफुल पटेल यांनी केले. पक्ष आणि चिन्ह आमच्या सोबत आहे. त्यामुळे त्यांना नोटीस काढण्याचा काहीही अधिकार नाही, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.
प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या नियुक्त्या अशा – अजित पवार- विधिमंडळ पक्षाचे नेते, सुनील तटकरे – प्रदेशाध्यक्ष (महाराष्ट्र), अनिल भाईदास पाटील – प्रतोद, रुपाली चाकणकर – राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष अशा नियुक्त्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांनी केल्या आहेत. विरोधी पक्षनेता नेमण्याचे काम हे विधानसभा अध्यक्षांचे असते. विरोधी पक्षात सगळ्यात जास्त आमदारांची संख्या ज्याची असते त्याची नेमणूक विरोधी पक्षनेतेपदी करतात. निव्वळ राष्ट्रवादीतील आमदारांमध्ये संभ्रम आणि भीती निर्माण व्हावी, म्हणून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला काही अर्थ नाही. बहुसंख्य आमदार हे राष्ट्रवादी पक्षासोबत म्हणजे आमच्याबरोबर आहेत. आम्ही एकत्र काम करतोय. पुढेही आम्ही महाराष्ट्राच्या भल्याकरिता काम करत राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी काम करणार. आणि राज्यातील विकासकामांसाठी केंद्राकडून जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा प्रयत्न करणार, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, अजित पवारांच्या भूमिकेनंतर राष्ट्रवादीचे नवनियुक्त विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की काही जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत अध्यक्षाची निवड करण्यात आली. त्याला कायदेशीर संविधानिक मान्यता नव्हती. पार्टीच्या संविधानानुसार शरद पवार हेच अध्यक्ष आहेत. निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या संविधानातून जन्माला आलेले नियम आव्हाडांनी वाचून दाखविले. अजित पवार गटाला विलिन होण्याशिवाय पर्याय नसल्याचे आव्हाड यावेळी म्हणाले. पक्षाला नुकसान करणार्या कोणत्याही पदाधिकार्याला काढण्याचा अधिकार पार्टी अध्यक्षाला आहे. यानुसार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित करण्यात आले आहेत. तुम्हाला कायदेशीर मान्यता नाही, असेही आव्हाड यांनी ठणकावून सांगितले.
https://breakingmaharashtra.in/ncp_crisis_pawar/