ChikhaliVidharbha

वारा आला धावून, प्रवासी निवारा गेला पडून!

– चिखली तालुक्यातील अनेक प्रवासी निवारे जीर्ण, लोखंडी साहित्यही चोरीस!

चिखली (महेंद्र हिवाळे) – जोराचा वारा आला आणि त्या वार्‍याच्या जोराने जीर्ण झालेला प्रवासी निवारा कोसळून पडल्याची घटना तालुक्यातील वाघापूर येथे घडली आहे. आता या निवार्‍याचे लोखंड चोरीस जात असून, बांधकाम विभागाने तातडीने या घटनेची दखल घेण्याची गरज आहे. तालुक्यातील अनेक प्रवासी निवारे जीर्ण झाले असून, ते कधीही कोसळू शकतात. या गंभीर प्रकाराकडे मात्र बांधकाम खाते दुर्लक्ष करत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर काही दारूडे व चोरटे हे अशा निवार्‍यांचे लोखंड चोरत असून, त्यातून दारूचे व्यसन भागवत असल्याचे दिसून येत आहे.

वाघापूर ग्रामीण भागात एसटी बसचा प्रवास करणार्‍या सामान्य नागरिकांना ऊन-पावसापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक गावात आणि गाव फाट्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने प्रवासी निवारे बांधण्यात आले. परंतु, वाघापूर येथील प्रवासी निवारा काही वर्षापासून जीर्ण अवस्थेमध्ये होता, या प्रवासी निवार्‍याची दुरवस्था एवढी झाली होती की एका वार्‍याच्या झुळक्यामध्ये तो जमीनदोस्त झाला. या प्रवासी निवार्‍या स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेही लक्ष नव्हते. तसेच कोणत्याही लोकप्रतिनिधीने आपल्या स्थानिक विकास निधीतून येथे प्रवासी निवारा नव्याने बांधण्याची तसदी घेतली नाही.

या गावात अनेक पक्षांचे नेते उदयास आले आहेत. परंतु एकाही नेत्याला किंवा लोकप्रतिनिधीला प्रवासी निवार्‍याची आवश्यकता भासली नाही. पावसाळा, उन्हाळा व हिवाळा अशा तीनही ऋतूंमध्ये प्रवाशांना बाहेर उघड्यावर बसेसची वाट पाहावी लागत असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे, याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. आता तर पडलेल्या प्रवासी निवार्‍याचे लोखंडी अँगल चोरीला जात असून, या बाबीकडे बांधकाम विभागासह पोलिसांचेदेखील दुर्लक्ष सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!