वर्धा (प्रकाश कथले) – वर्धा येथील एमआयडीसी परिसरातील भंगाराच्या गोदामास तीन तासापूर्वी भीषण आग लागली असून, त्यावर नियंत्रणाचे आटोकाट प्रयत्न सुरू होते. तूर्तास तीन अग्निशमनदलाच्या गाड्या आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
पुलगाव येथील सैन्यदलाच्या भांडारातून अग्निशमन दलाची मदत बोलवण्यात आली आहेत. वासिम नामक भंगार व्यापार्यांचे हे गोदाम असल्याची माहिती मिळाली आहे. जुने प्लास्टिक, पेयजल बॉटल, लाकूड फाटा याचा भरपूर साठा गोदामात असल्याने आग चांगलीच भडकत आहे. आगीचे लोळ तसेच धूर आकाशात उठत असून, परिसरात आगीच्या उष्णतेची धग जाणवत आहे, तरीही अग्निशमन दल पथक आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.
या आगीने लगतच्या गोदामात शिरकाव सुरु केल्याची माहिती घटनास्थळी असलेल्या काहींनी दिली. प्रशासनातील काही अधिकारी घटनास्थळी हजर झाले होते. आगीमुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे, अद्याप आग घुमसत असल्याने नुकसान किती झाले, याचा अंदाज येत नाही, पोलीस ही घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझविण्यासाठीचे सर्व प्रयत्न सुरू असून आग पसरू नये, याचीही काळजी घेतली जात आहे.
————-