चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील भालगाव येथे मागील आठवड्यात सोसाट्याचा वारा व पावसामुळे कोसळून पडलेल्या झाडाखाली एका शेतकर्याचा मृत्यू झाला होता. या शेतकर्याच्या पत्नीला चौथ्या दिवशी सर्व शासकीय कागदपत्रांची व नियमांची पूर्तता करून चार लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश आ.श्वेताताई महाले पाटील व तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी घरी जाऊन दिला. तसेच, या शेतकरी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात आले.
तालुक्यातील भालगाव येथे ३० एप्रिल रोजी दुपारी सोसाट्याच्या वार्यासह वादळी पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. येथील ज्ञानबा श्रीपत चव्हाण हे बकर्या चारण्यासाठी गेले असता, पावसात त्यांनी आंब्याच्या झाडाचा आसरा घेतला. पण अचानक ते झाड त्यांच्या अंगावर कोसळले आणि त्यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर ४ मे रोजी त्यांच्या पत्नी शांताबाई चव्हाण यांना नैसर्गिक आपत्ती निधीतून ४ लक्ष रूपयाचा धनादेश आ. श्वेताताई महाले यांनी आर्थिक मदत म्हणून सुपूर्द केला. यावेळी तहसीलदार सुरेश कव्हळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रतापसिंग राजपूत, तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, सरपंच अशोक पाटील, गणेश परिहार, तलाठी काळे, गजानन परिहार, धनंजय भगत, समाधान चव्हाण, मनोहर चव्हाण, दिलीप परिहार, अजाबराव लोंढे, गजेंद्र भगत, रमेश डुकरे, अंबादास, राजेंद्र गवई, शिवाजी चव्हाण, गणेश भगत, स्वप्नील पडघान आदी उपस्थित होते.