शांतता पुरस्कारप्राप्त दबंग अधिकारी सुनील कडासने बुलढाण्याचे नवे पोलिस अधीक्षक
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी/ विशेष प्रतिनिधी) – जातीय व धार्मिक सलोखा प्रस्थापित करण्याचा मालेगाव पॅटर्न विकसित करणारे दबंग पोलिस अधिकारी सुनील कडासने यांची बुलढाणा येथे जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सारंग आवाड यांच्या पदोन्नतीनंतर हे पद रिक्त झाले होते. राज्याच्या गृहविभागाने आज दोन वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केल्या असून, त्यामध्ये आयपीएस महेश पाटील यांच्यासह कडासने यांचा समावेश आहे. बुलढाण्यात येण्यापूर्वी कडासने हे नागपूर येथे लोहमार्ग पोलिस अधीक्षक होते. त्यांची राज्यातील संवेदनशील अशा मालेगाव येथील कारकीर्द अत्यंत उल्लेखनीय अशी राहिली आहे. यापूर्वी त्यांनी बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर येथे एसडीपीओ म्हणून काम पाहिलेले आहे. तसेच त्यांचे वडील हे बुलढाणा येथे सिव्हिल सर्जन हाेते, त्यामुळे त्यांचे बालपण बुलढाण्यात गेलेले आहे.
राज्य गृह विभागाने आज दोन वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये आयपीएस अधिकारी महेश पाटील आणि पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांचा समावेश आहे. त्याच्या बदलीबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले आहेत. त्यानुसार, महेश पाटील (पोलिस उपमहानिरीक्षक, दहशतवादविरोधी पथक, मुंबई यांची अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर येथे बदली झाली आहे. तर सुनील कडासने पोलिस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर यांची पोलिस अधीक्षक, बुलढाणा येथे बदली झाली आहे. बुलढाण्यात यापूर्वी त्यांनी मलकापूर येथे एसडीपीओ म्हणून काम पाहिलेले आहे.
नेहमीच जातीय दंगली, धार्मिक तेढ यामुळे अतिसंवेदनशील असलेल्या मालेगाव शहरात कायदा सुव्यवस्था व सलोखा राखण्याची मोठी जबाबदारी येथील अधीक्षकांवर असते. कडासने यांनी कायदा सुव्यवस्था मोडणार्यांच्या मुसक्या आवळीत तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाकडून जातीय सलोखा कायम राहावा यासाठी विविध कार्यक्रम घेत, मालेगावची शांतता कायम राखण्यात मोठे योगदान दिले आहे. हिंदू-मुस्लिम बांधवांचे दोनही सण अत्यंत उत्सवात आणि शांतता व सलोख्यात संपन्न करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत राज्य शासनाने त्यांना महात्मा गांधी शांतता पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे. या शिवाय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये (एसीबी) पोलिस अधीक्षक म्हणून त्यांची नाशिक येथील कारकीर्दही अत्यंत उल्लेखनीय राहिली आहे. त्यांच्या कारकिर्दीत नाशिक विभागातील बहुतांश लाचखोर चतुर्भूज झालेले आहेत. असे जातीय व धार्मिक सलोखाप्रिय व दबंग अधिकारी आता बुलढाणा येथे आले आहेत.
सुनील कडासने यांनी यापूर्वी मलकापूर डीवायएसपी म्हणून सेवा दिली आहे. सध्या ते लोहमार्ग नागपूर येथे कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी मलकापूर विभागाचे डीवायएसपी म्हणून उत्तमरित्या काम पाहिलेले आहे. २००३-०४ मध्ये तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश प्रसाद यांच्या नेतृत्वातसुद्धा त्यांनी आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. एसपी सुनील कडासने यांची बुलढाण्याशी नाळ जुनी आहे. १९९४ -१९९५ मध्ये त्यांचे वडील डॉक्टर कडासने हे बुलडाण्याचे सिव्हिल सर्जन होते. त्यामुळे सुनील कडासने यांचे बालपण बुलढाणा शहरांमध्ये गेलेले असून, त्यांचे शिक्षण विवेकानंद गुरुकुंजमध्ये झालेले आहे आणि बालपणातले त्यांचे मित्रदेखील बुलढाणा शहर व परिसरात आहेत. त्यामुळे बुलडाणा आणि मलकापूर येथे कडासने परिवारचा मोठा मित्रपरिवार आहे.