सिंदखेडराजा/ साखरखेर्डा (प्रतिनिधी) – प्रत्येक पावसाळ्यात डोकेदुखी ठरणार्या भोगवती नदीवरील पुलाचे रेंगाळलेले काम दोन वर्षे झाली तरी पूर्ण झालेले नाही. सद्या अवकाळी पावसामुळे या पुलाची आणखीच दुरवस्था झाली असून, आता पावसाळा सुरू होत असल्याने नदीला पूर आल्यास हा मार्ग पुन्हा एकदा ठप्प पडून ग्रामस्थांचे हाल होणार आहेत. लव्हाळा ते साखरखेर्डा मार्गावरील हा पूल परिसरातील गावांसाठी प्रचंड डोकेदुखी बनला असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधी देऊनही हा पूल पूर्ण होत नसल्याने परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लव्हाळा ते साखरखेर्डा मार्गावरील जुना इंग्रजकालीन पूल धोकादायक बनल्याने भोगवती नदीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निधीतून नवा पूल तयार केला जात आहे. परंतु, दोन वर्षापासून या पुलाचे काम रखडलेले आहे. सद्या या पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी रस्ता कसा करावा, अशी तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता काम पुन्हा रेंगाळले आहे. हा पूल पूर्ण झाला परंतु, पुलाजवळून शिंदी-मेरा जाणार्या रस्त्याला वळण कसे काढायचे व मुक्तीधाम – महादेव मंदिर रस्ता, माळीपुर्यात जाणारा रस्ता कसा काढायचा, हे प्रश्न सोडविण्यात सार्वजनिक बांधकाम खात्याला अपयश येत आहे. बांधकाम खात्याने नदीवरील पुराचा धोका पाहाता, पुलाची उंची वाढवली, परंतु या रस्त्यांचे नियोजनच केले नाही. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. साखरखेर्डा ते लव्हाळा हा रहदारीचा मार्ग असून, सद्या अवकाळी पावसाने पर्यायी पुलाची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे वाहनधारकांना अतोनात त्रास होत आहे. पुलावर पडलेले खड्डे, मध्येच खोदलेली पाईपलाईन यामुळे वाहनधारक जीवघेणा प्रवास करत आहेत. या पुलाच्या प्रश्नी परिसरातील गावांतील काही सुज्ञ नागरिक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेच तक्रार करणार असल्याची माहिती हाती आली आहे.
—————-