बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या बळावर क्रांती घडविली. शिक्षण वाघिणीचे दूध मानले जाते. हे दूध प्राशन करणे म्हणजेच खर्याअर्थाने भीम जयंती साजरी करणे होय. आज बाबासाहेबांचे विचार कृतीत उतरविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पत्रकार दीपक मोरे यांनी केले. मछली आउट येथे आयोजित जयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
१४ एप्रिल रोजी बुलडाणा शहरातील तानाजी नगर, मच्छी ले आउट येथील अल्पसंख्यांक शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम पत्रकार दीपक मोरे यांच्या हस्ते धम्मद्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मला अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित बौद्ध उपासक, उपासिका यांना सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
पत्रकार दीपक मोरे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र अंगीकारून पुढे वाटचाल करणे म्हणजे वैचारिक वारसा जपणे आहे. सर्वाना सोबत घेऊन आपण प्रगती साधली पाहिजे. बाबासाहेबानी दिलेला मूलमंत्र आपण अंगिकरला तरच समाज प्रगती पथावर जाऊ शकतो, असे मोरे म्हणाले. यावेळी संदीप जाधव, उत्तम गायकवाड, प्रदीप मोरे, गौतम मोरे, गोदावरीबाई हिवाळे, अंजुबाई दराखे, कुसुमबाई मोरे, रमाबाई जाधव, वर्षा हिवाळे यांच्यासह असंख्य बौद्ध उपासक, उपासिका यावेळी उपस्थित होते.