वाशिम जिल्ह्यातील जवान अमोल गोरे चीन सीमेवर शहीद; दोन साथीदारांना वाचवले, मात्र स्वतः पत्कारले वीरमरण
सोनखास, जि.वाशिम (संजय निकाळजे) – अरुणाचल प्रदेशातील कमिंग व्हॅली येथे चीन सीमेवर देशाचे रक्षण करताना १७ एप्रिल रोजी दुपारी ४.२० वाजता वाशिम जिल्ह्यातील सोनखास येथील भारतीय सैन्य दलातील जवान अमोल गोरे याला वीरमरण आले. त्याचे पार्थिव बुधवार १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान त्याचे राहते गावी सोनखास येथे आल्यानंतर त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. व त्याला अखेरचा निरोप देण्यात आला.
सोनखास ता. जि. वाशिम येथील अमोल गोरे आणि त्याचे दोन सहकारी जवान चीन सीमेवर गस्तीवर असताना कमिंग व्हॅली येथे मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहत होते. यादरम्यान, पाण्याच्या मोठा प्रवाह त्यांच्या दिशेने आला. या प्रवाहात अमोल व त्याचे दोन सहकारी जवान वाहून जात असताना अमोलने आपल्या जिवाची परवा न करता त्यांना पाण्याच्या प्रवाहातून वाचवत असताना अमोलच्या डोक्याला पाण्याच्या प्रवाहातील एक मोठा दगड लागला. आणि त्यातच अमोल शहीद झाला. आपल्या दोन सहकारी जवानांना वाचविण्यात यश आले, मात्र अमोलला देशाच्या सुरक्षितेसाठी तैनात असताना वीरमरण पत्करावे लागले.
अमोल गोरे सन २०१० मध्ये भारतीय सैन्यात भरती झाला होता. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या अमोलचे लग्न वैशाली यांच्याशी सन २०१६ मध्ये झाले. अमोलने सैन्यात असताना पोहण्याचे प्रशिक्षणसुद्धा घेतले होते. त्याचे पार्थिव रात्री २ वाजता सुमारास गुवहाटी येथून पुणे येथे पोहोचले. पुणे येथून सैन्याच्यावतीने मानवंदना दिल्यानंतर औरंगाबाद वरून मालेगाव मार्गे वाशिमला आणण्यात आले. वाशिम येथून त्याची पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. त्याच्या अंत्ययात्रा प्रसंगी अकोला नाक्यावर हजारो नागरिकांची उपस्थिती होती. अमर रहे, अमर रहे , शहीद जवान अमर रहे..! भारत माता की जय अशा विविध प्रकारच्या घोषणा देत शहरातून अंत्ययात्रा आंबेडकर चौक, पाटणी चौक मार्गे काढण्यात आली. अंत्ययात्रेत लाखोच्या जनसमुदाय उसळला होता. त्याची अंत्ययात्रा त्याच्या गावी सोनखास येथे पोहोचताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. त्याच्या या कुटुंबाचा आक्रोश पाहता उपस्थितांचेही डोळे पाणावले. त्यावेळी त्याला सैन्याच्या वतीने मानवंदना देण्यात आली. व त्याच्यावर शासकीय एकमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते व हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता, शहीद अमोल गोरे च्या पश्चात शेतकरी वडील तानाजी, आई, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, एक बहीण व मोठा परिवार आहे.