बुलढाणा (प्रशांत खंडारे) – लालूच एवढी वाढली की, पैशाशिवाय कामे होत नाहीत. लाचखोरीला लगाम लावण्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)चा प्रयत्न सुरू आहे. आजही नोंद रद्द करण्यासाठी एका ग्रामसेवकाला तीन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विजय साहेबराव रिंढे (५०) राहणार शेलसूर, ता. चिखली असे आरोपीचे नाव आहे. ही सापळा कारवाई बुलढाणा येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात करण्यात आली.
देऊळगाव मही येथे तक्रारदाराची सामायिक शेतजमीन आहे. या जमिनीवर काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. ही शेतजमीन वापरू शकत नसताना या जमिनीबाबत ग्रामपंचायत कार्यालय देऊळगाव मही येथे नमुना रजिस्टरला नोंद करण्यात आली आहे. सदर नोंद रद्द करण्यासाठी तक्रारदारांनी पंचायत समिती देऊळगावराजा यांच्याकडे अर्ज केलेला होता. मात्र हा अर्ज ग्रामपंचायत देऊळगावमही येथे वर्ग करण्यात आला. नोंद रद्द करण्यासाठी आरोपी ग्रामसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष तीन हजार रुपयांची लाचेची मागणी केली आणि लाच देखील स्वीकारली. दरम्यान, एसीबीच्या पथकाने आरोपी ग्रामसेवकांना रंगी हात पकडले. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एसीबी चे पोलीस उपाधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात सापळा व तपास अधिकारी पोनी सचिन इंगळे, पो. हवा. विलास साखरे, प्रवीण बैरागी, विनोद लोखंडे,जगदीश पवार, स्वाती वाणी यांनी ही कारवाई केली.