बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यात गारांसह अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असताना, या तडाख्यात मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा शिवारातील जवळजवळ १०२ हेक्टर कांदा व टरबूज पिकांचेदेखील मोठे नुकसान झाले होते. तसा अहवाल तलाठ्यांनी वरिष्ठांना दिला आहे. या नुकसानीची जिल्हास्तरीय पथकही पाहणी करणार आहे तर नुकसानग्रस्त शेतकरी अद्याप मदतीची वाट पाहत आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात जोरदार अवकाळी पाऊस व गारा पड़ल्याने रब्बीसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा शिवारातही १८ मार्चरोजी गारांचा पाऊस पड़ला. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’मध्ये वृत्त प्रसारित होताच मेहकरचे तहसीलदार संजय गरकल यांनी त्वरित पाहणीचे आदेश दिल्यानंतर तलाठी तुळशिदास काटे यांनीही तातडीने पाहणी करून कांदा ७५ हेक्टर व टरबूज २७ हेक्टरचे नुकसान झाल्याचा अहवाल वरिष्ठांना दिला आहे. या नुकसानीची माजीमंत्री सुबोध सावजी यांनीही पाहणी करून जाग्यावरच नुकसानीची मदत देण्याची मागणी केली होती. आपत्ती विभाचे जिल्हास्तरीय पथक एक, दोन दिवसांत स्थळपाहणी करणार असल्याचे तलाठी तुळशिदास काटे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
संकटावर संकटे येत असल्याने शेतकरी पूर्णतः खचला असून, त्याला आधार देण्याची खरी गरज असताना शासन मात्र पाहणी वर पाहणी करण्यातच वेळ लावत असल्याचा आरोप केला जात असून, तातड़ीने मदत द्यावी, अशी रास्त मागणी शेतकरी करत आहेत.
——————