एकनाथ शिंदे म्हणे आज सकाळी-सकाळी कामाख्या दर्शनाला जाऊन महाराष्ट्रासाठी आशीर्वाद मागून आले…
बुलडाणा(जिल्हा प्रतिनिधी) एकनाथ शिंदे म्हणे आज सकाळी-सकाळी कामाख्या दर्शनाला जाऊन महाराष्ट्रासाठी आशीर्वाद मागून आले…चांगलेच आहे तसे. अर्थात माता तुळजाभवानी, आई एकवीरा, पंढरीचा विठोबा… हे सारे आहेच महाराष्ट्राच्या जनतेचे हित पाहायला. हा, म्हणजे जनतेला उगाच इथली माती सोडून 8,000 किलोमीटरवर जायला नको आशीर्वाद घ्यायला. इतर कुणाला स्वार्थ आणि सत्तेसाठी घ्यायचेच असतील तर त्याने महाराष्ट्र सोडून कुठेही जाऊन घ्यावेत आशीर्वाद. ज्याचा-त्याचा प्रश्न.
आता मूळ प्रश्न –
स्वखुशीने तिकडे गेलेल्या, कैदेतील सर्व फुटीर आमदारांनाही कामाख्या दर्शनाला सोबत नेले होते का? असेल तर चांगलेच आहे. 8 दिवस कोंडून ठेवलेल्या त्या बिचाऱ्यांनाही मोकळा श्वास घेता आला असेल निवांत. त्यांनाही स्वतःच्या लवकर सुटकेसाठी आशीर्वाद घेता आले असतील. माता कामाख्या या सर्वांचे भले करो, त्यांना कैदेतून लवकर मुक्त करो.
*जर या सर्व स्वखुशीने आणि मर्जीने तिकडे आलेल्या सर्व आमदारांना कामाख्या दर्शनाला सोबत नेले नसेल तर…. ???*
मग मात्र प्रश्न अनंत आहेत…. त्यांच्या मर्जी आणि निष्ठेवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे तर मग. त्यांना बाहेर मोकळे सोडणे अजूनही रिस्क वाटते तर मग. कोण असेल *ट्रोझन हॉर्स?* (आता कळले, की जाता-जाता 11 वाजता एकदम चोख बंदोबस्तात या सर्व फुटीर आमदारांना कामाख्या दर्शनाला नेणार आहेत, जबरदस्त सिक्युरिटीत नेणार आहेत, कुणी स्वखुशीने, स्वमर्जीने इकडे-तिकडे फिरू शकणार नाही मंदिरात. बसमध्ये कोंबून, मंदिरात उतरवून, दर्शन घेऊन, पुन्हा बसमध्ये कोंबणार. बिचारे फुटीर आमदार चार्टर प्लेन, खास विमानाने फिरत तर आहेत; पण त्यांना ना आसामात पर्यटनाचा आनंद लुटता आला, ना गुजरातेत, ना की गोव्यात मिळेल!) अजून एक, बातम्या किती इंटरेस्टिंग फेकतात बघा – फुटिरांना म्हणे, *बॅगा भरून तयार* राहायला सांगितले आहे; पण बॅगा आहेत कुठे त्यांच्याकडे? माध्यमातील बातम्या पाहिल्या तर *फक्त एका चड्डी-बनियानवर गेले आहेत* ते. ते कुठून बॅगा भरणार? आणि बॅगेत काय भरणार? *50-50 कोटी आसामी सुपाऱ्या घेऊन येणार का महाराष्ट्रात, महाराष्ट्रासाठी?* पण मला वाटत नाही, की त्यांना त्या तिकडे घेता आल्या असतील, कारण ते तर कैदेत आहेत. तिथे मुक्त आहेत फक्त फुटीर म्होरके. त्यामुळे या खास सुपाऱ्या असतील घेतलेल्या (खरेदी केलेल्या) कुणीतरी आसामातील, तरी त्या इतर सर्वांना इकडे आल्यावरच, सर्व सोपस्कार पार पाडल्यावर, सर्व स्थिरस्थावर झाल्यावर, बहुधा बहुमत चाचणी पार पडल्यानंतरच वाटल्या जातील. या खास आसामी सुपारी घेऊन आनंदाने नाचत-बागडत मग सर्व आपापल्या घरी जातील कदाचित. त्यांच्या घरीही या इतक्या मस्त सुपारी पाहून किती आनंद होईल. अर्थात, आसामहून आणलेल्या या खास सुपारी आपल्यालाही थोड्या-थोड्या का होईना, पण मिळाव्यात चवीला अशी साहजिकच कार्यकर्ते आणि मतदार संघातील जनतेचीही अपेक्षा असणार. काही फुटीर वाटतीलही काही प्रमाणात, काही मात्र स्वतःच एकट्याने खाऊन वर ढेकरही देणार नाहीत. *बहुमत चाचणी, सरकार यांचे काहीही होवो; परंतु मतदारसंघात परतल्यावर फुटीर आमदारांना आसामहून खास मिळवलेल्या या सुपारी मात्र डोकेदुखी धरू शकतील.* त्याची चव जर त्यांनी वानगीदाखल आपल्या भागात चाखायला दिली नाही, तर मतदारसंघात नाराजी आणि असंतोष उफाळून येण्याची शक्यता आहे. कारण आसामी सुपारी किती खास चवीच्या असतात ते आता काही लपून राहिलेले नाही. ज्याची-त्याची सुपारी ज्याला-त्याला मुबारक. आधी तुम्ही इकडे या रे बाबांनो… ते आमदाराने तोंड लपवत फिरणे, त्यांना बखोट्याला धरून गुरा-ढोरागत हाकतात, आमदार गप-गुमान कुणीतरी डोळे वटारून, भुतडं खोडून बसवल्यासारखे बसतात. हे सारं बरं नाही दिसत. गावात, मतदारसंघात किती शान, वट असते या लोकांची. त्यांना इतके केविलवाणे, असहाय्य, आगतिक कधीही पाहिले नव्हते जनतेने. वाईट वाटते सर्वांना. या लवकर आपापल्या घरी, सर्व घरची मंडळी, मतदारसंघातील जनता वाट पाहताहेत. हे सारे आसामातील कैदेतून मुक्त असतील तेव्हा काय चित्र दिसेल? गावातील *कोंडवाडा* डोळ्यासमोर उभा राहतो…. ग्रामपंचायतीचा माणूस जेव्हा कोंडवाड्याचा दरवाजा उघडतो तेव्हा आतील कैदेतील बिचारी मुकी जनावरं आनंदाने उधळत-बागडत, एकमेकाला ढुश्श्या देत स्वतःच्या मर्जीने मुक्तपणे चौखूर उधळत, त्यांना वाटेल तिकडे जातात. हा आनंद कुठल्याही फाईव्ह स्टार सुविधा असलेल्या कोंडवाड्यापेक्षा कधीही भारी! अर्थात गावात असल्याने, समोर कोंडवाडा असल्याने हे चित्र चटकन उभे राहिले. पण आसामात कैदेत असलेले सारे आपली माणसे आहेत, हाडा-मासाची माणसे, शिवसेनेच्या नावावर जनतेने निवडून दिलेले… कुणी काहीही म्हणत असले, बळी देण्यासाठीचे रेडे, डुकरे, घाण, “इतक्या-तितक्या बापाचे” मार्गदर्शन घेणारे वैगेरे वैगेरे … तरी त्याला अर्थ नाही. माणसे आहेत ती आपली, तिकडे जाऊन फसलेली. त्यांनाही इकडे येऊन मोकळा श्वास घ्यायला निश्चितच आनंद होईल आणि हा स्वतःच्या मर्जीने मिळणारा आनंद गगनात न मावणारा असेल, एव्हढे नक्की! हेच अधोरेखित करणारा हा मुद्दा आहे. ओघाने डोळ्यासमोर आलेल्या गोष्टींचा भलताच संबंध जोडून कुणी गफलत करायला नकोत उगाच.
या सर्व आठवडाभरातील नाट्यात आणखी काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. जसे आदित्य ठाकरे यांचे जबरदस्त वेगाने विकसित होणारे शिवसेना स्टाईल जबरदस्त व्यक्तिमत्त्व यावर मी थोडासा मुद्दा लिहिला, नंतर त्यावर सविस्तर लिहीन. तसेच एक गंमतीशीर मुद्दा जाणवतो आहे – म्हणजे ठीक आहे, की एकनाथ शिंदे यांनी (ते दावा करतात तसे) शिवसेनेतील 39 आमदार सोबत नेले आणि फुटीर मोठा गट बनवला; पण खरेच शिंदे इतके मोठे नेते आहेत का? धर्मवीर आनंद दिघे हे खूप मोठे नेते होते, त्यांनी काहीही संपत्ती, माया जमा केली नाही. कार्यकर्ते हीच त्यांची संपत्ती. अतिशय साधे आणि एकनिष्ठ, प्रामाणिक असे ते धर्मवीर. तो आणि तेव्हढाच वकूब इतर कुणाकडे असेल असे वाटते का? काही ज्येष्ठ नेते हे पवार साहेब, उद्धव साहेब, अजितदादा, राहुलजी, मोदीजी किंवा इतर आणखी काही म्हणण्याऐवजी, वारंवार “Xदेसाहेब” वैगेरे म्हणतात, तेव्हा गंमत वाटते. असो. ठाण्याबाहेर एकनाथ शिंदे यांचे फारसे काही प्रभावक्षेत्र नाही. बघूया आता हे उद्धव सरकार पडेल आणि फुटीर भाजपसोबत सत्तेत येतील तेव्हा कसा चालतो हा संसार. भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विद्यमान आमदार यांच्या मतदारसंघात पुढील निवडणुकात या फुटीर सेना आमदारांना कसे पुनर्वसित करणार? भाजपाच्या मंडळींवर अन्याय होणार नाही ना या फुटिरांच्या मतदारसंघात? त्याहून मनोरंजक ठरेल ते आधीच्या युती सरकारात भाजपा, फडणवीस हे शिवसेना आमदारांना निधी मिळू देत नाहीत म्हणून राजीनामा देणारे शिंदे यांना भाजपा आता किती भरभरून निधी देईल? इतर फुटीर आमदारांनाही भाजपा रग्गड निधी देऊन त्यांचे मतदारसंघ सुजलाम-सफलाम करून त्या भागातील प्रश्न सोडविणार का? या हिंदुत्ववादी बहाद्दरांनी इतक्या दिवसात एकदाही कुठल्या मशिदीसमोर जाऊन सामूहिक हनुमान चालिसा पठन केलेले नाही, की कुठल्या आसासातील मंदिरात जाऊन घंटा बडवल्या नाहीत. आठ दिवस कैदेत राहिल्यानंतर बिचाऱ्यांना शेवटच्या दिवशी कामाख्या दर्शनाचे भाग्य लाभले, हाकेच्या अंतरावर मंदिर असूनही. सध्या कैदेत दबून राहिलेले यांचे हिंदुत्व पुढे कसे बहरते, ते आता पाहावे लागेल. आमच्या *जळगाव जिल्ह्यासाठी* तर या सर्वांहून जास्त मिलियन डॉलर प्रश्न आहे तो – एकमेकांच्या उरावर बसणारे दोन नेते हे आता नव्या घरोब्यात सुखाने कसे नांदणार? दोघांपैकी एकालाच मंत्रिपद मिळाले तर दुसरा त्याला आधीसारखीच बत्ती लावत राहणार का? की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच लाभ होणार? असेच चित्र कमी-अधिक फरकाने सर्व जिल्ह्यात असतील. 39 अस्तनीतील निखारे घेऊन फडणवीस पुढे कसा प्रवास करतात बघूच. शिंदे यांच्यासाठीही या सर्वांना पुढे सांभाळणे अत्यंत आव्हानात्मक असेल. तेव्हढे कौशल्य त्यांच्याजवळ आहे का? सत्तेत डोकेदुखी जास्त असते. नवे प्रश्न निर्माण होतात. माध्यमांचे पुढील अडीच वर्षात चांगभले होत राहणार, फटाके फुटत राहणार. एक मात्र नक्की, की *उद्धव ठाकरे* यांच्या रूपाने महाराष्ट्राने अत्यंत सभ्य, सुसंस्कृत आणि संयमी तसेच खुर्चीचा, “वर्षा”चा मोह नसलेला मुख्यमंत्री पाहिला. अडीच वर्षे गुडघ्याला बाशिंग बांधून उतावीळ असलेल्या मंडळींना आता भिंती घाण न केलेला “वर्षा” मिळेल; पण महाराष्ट्र उद्धव यांच्यासाठी हळहळत राहील. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अत्यंत सुसंस्कृत अध्याय लवकरच संपेल. पुढे जाऊन शिवसेना उभारी घेऊन नव्याने उभी राहील. नवे नेते निर्माण होतील. *आदित्य ठाकरे* हे बाळासाहेबांच्या रुपातीलच आक्रमक नेतृत्व भविष्यात सेनेला नव्या उंचीवर घेऊन जाईल. तोवर उद्धव यांना आई जगदंबा उत्तम आरोग्य प्रदान करो. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे शुभाशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत.
पुन्हा काही अतिशय गंभीर मुद्दे :
1. जनतेला प्रश्न पडले आहेत अनेक. ठीक आहे राज्यपाल हे घटनात्मक पद आहे; पण कुठलेही मतदान हे गुप्त मतदान, आवाजी मतदानाने, मतविभागणी किंवा जागेवर उभे राहून शिरगणतीने (हेड काऊंट) हे नेमके कसे घ्यावे हे राज्यपाल कुठल्या आधारावर ठरते. शिरगणती म्हणजे हेडकाऊंटमध्ये *काही हिशेब करणे सोपे* होत असेल का? काय-काय प्रश्न पडतात लोकांना. हे लिहीत असतानाच एका मित्राने विचारले – आमदार विधिमंडळ सभागृहात शिरतात तेव्हा त्यांची सुरक्षा तपासणी होते का? म्हणजे जसे विमानतळावर सुपारी, गुटखा, कुंकू-हळद, नेलकटर, चाकू वैगेरे वैगेरे न्यायला परवानगी नसते. तर, या मित्र महोदयांचा प्रश्न ,की *विधिमंडळ सभागृहात सुपारी घेऊन जाता येते का?* त्याला प्रश्न पडला, की समजा फुटीर आमदार जर आसामातून काही खास सुपारी घेऊन (विकत, खरेदी करून) सोबत घेऊन आलेले असतील, तर त्यांना ती सभागृहात सोबत घेऊन जाता येईल का? सभागृहात सुपारी फोडता येतील का? इतके वर्षे विधिमंडळ अधिवेशने (सेशन) कव्हर करून मला कधी हा प्रश्न पडला नाही. अर्थात महाराष्ट्राच्या सभ्य, सुजाण, सुसंस्कृत आणि महान परंपरा असलेल्या राजकारणात आजवर कधी असे घडले नाही. सभागृहात आसामातून सुपारी घेऊन कधी कुणी येऊ शकते, हा विचारही कधी कुणाला शिवला नसता. त्यामुळे माझ्याकडे तरी या प्रश्नाचे उत्तर नाही; पण लोकांना, जनतेला पडतात अनेक प्रश्न!
2. राज्यपाल भवनातील ड्राफ्ट काल फुटला, राज्यपालांच्या नावे असलेले पत्र व्हायरल झाले. किती भयंकर गोष्ट आहे ही. त्याहीपेक्षा *राजभवनासाठी किती लाजिरवाणी?* न्यायप्रिय आणि शिस्तप्रिय राज्यपाल महोदय नक्कीच याची गांभीर्याने दखल घेतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांना जो आदेश देणार होते, त्याचा ड्राफ्ट असा कसा व्हायरल होऊ शकतो? आज थोड्या-फार फरकाने तसाच आदेश आलाही. म्हणजे, काय घडणार आहे, हे कुणाला तरी आधीच माहिती होते का? कुणाला तरी वाटते, की असे आदेश निघावेत आणि तसाच आदेश निघतो दुसऱ्या दिवशी, याचा काय अर्थ घ्यायचा? घटनात्मक पदे आणि पीठे ही कुणाच्या तरी हातचे बाहुले बनून, कुणाच्या तरी इशाऱ्यावर काम करत आहेत, असा उगाच जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्याच्या राज्यपालांना हे मुळीच रुचणार नाही. *राजभवनच्या घटनात्मक भूमिकेवर प्रश्नचिन्ह* उभे राहणार नाही, *राजभवनाची बेअब्रू* होणार नाही, हे नक्की राज्यपाल पाहातीलच. त्यांच्या आदेशाचा ड्राफ्ट व्हायरल होण्याच्या घटनेच्या चौकशीचेही ते जेट स्पीडने तात्काळ आदेश देतील, अशी महाराष्ट्रातील जनतेची भावना आहे.
*राजभवनच्या आदेशाची पत्रे फुटतात, आदेश पोहोचण्यापूर्वी माध्यमांना कळतील, अशी व्यवस्था* केली जाते. महाराष्ट्रातील माध्यमांना कळण्यापूर्वी, कन्फर्म होण्यापूर्वी जर काही आदेश, पत्र, तारखा या 8,000 किलोमीटरवरील कामाख्या माता मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचत असतील तर हेही किती भयानक आहे. महाराष्ट्रात किती बेदिली आणि अंदाधुंदी माजविली जात आहे महाराष्ट्रद्रोही, विघातक शक्तिंकडून ते सारे नक्कीच सुजाण आणि सभ्य मराठी जनमानसाला व्यथित करणारे आहे. खतांचे लिंकिंग होते ग्रामीण भागात, तसे *काही माध्यमांशी, फुटिरांशी जणू महाराष्ट्रद्रोही शक्तिंचे लिंकिंग* झालेले दिसत आहे. ग्रामीण भाषेत याला *लेंडमुंड* म्हणतात. अशी कोणतीही लेंडमुंड ही महाराष्ट्राच्या, मुंबईच्या जीवावर उठू नये, हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. अशी काही लेंडमुंड जेव्हा समाजाला उपद्रवकारक ठरतात, तेव्हा त्याच्यावर *दांडुक्याचे प्रहार* करून आणि *कमरेत लाथा* घालून लेंडमुंड जोडीदारांना वेगळे केले जाते. ती वेळ न येवो. बघूया पुढे काय-काय होते ते!