सिद्धबेटाचे पावित्र्य जोपासण्यास सर्वांनी सहकार्य करावे : मुख्याधिकारी कैलास केंद्रे
आळंदी (अर्जुन मेदनकर) – येथील पवित्र सिध्दबेटाचे स्थान माहात्म्य, पुरातन वैभव लक्षात घेऊन सिद्धबेटाचे पावित्र्य जोपासण्यास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले. येथील सिद्धबेट ग्राम विकास प्रतिष्ठानचे माध्यमातून विंधन विहिरीवर विद्युत मोटारपंप बसवून वृक्षांना पाणी देण्यासाठीची यंत्रणा विकसित करण्यात आली. या विकसित पाण्याचे यंत्रणेचे लोकार्पण मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
या प्रसंगी माऊलीदास महाराज, संयोजक आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, भागवत काटकर, किरण नरके, ज्ञानेश्वर उर्फ बापू कुर्हाडे, मयूर पेटकर, सहदेव गोरे आदी सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सिद्धबेट विकासाचे कार्यास गती दिल्या बद्दल मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांचा सत्कार माऊलीदास महाराज यांचेहस्ते करण्यात आला. तसेच सिद्धबेट ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, केळगाव ग्रामपंचायत माजी सरपंच विकास शेठ मुंगसे यांचे कार्याचा गौरव म्हंणून विविध सेवाभावी संस्थाच्या तर्फे सत्काराचे नियोजन उत्साहात करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले, आळंदी शहरामध्ये सिद्धबेटाचे महत्त्व स्थानिक नागरिकांना माहिती आहे. परंतु जे नागरिक भाविक म्हणून बाहेरून येतात त्यांना या जागेचे तितकेसे महत्त्व माहिती नाही. आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे कि, माऊलींचे आई वडील आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात वास्तव्यास होते. अशा पवित्र भूमीची माहिती सर्वां पर्यंत पोहोचली पाहिजे. या ठिकाणी येणार्या सर्वाना येथील आल्हाददायक वातावरण व्यवस्थित रित्या त्याचे महत्व या ठिकाणी पाहता यावे. यासाठी सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नगरपरिषद प्रशासना मार्फत सर्व नागरिक आणि विविध सेवाभावी संस्थानच्या मदतीने या ठिकाणी हळू हळू एक एक कार्यक्रम राबवित, उपक्रम हाती घेत प्रामाणिकपणे जी या ठिकाणची वस्तुस्थिती आहे ती बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी स्थानिकांचे मदतीचे हात समोर येत आहेत. प्रशासन मार्फत जे बदल करण्याचे आहेत जसे गार्ड नियुक्ती आणि इतर सर्व हे आपल्यावर थोपवले गेली आहे. हे न समजता आपण ते चांगला बदल करण्यासाठी आपण ते करत आहोत याचा स्वीकार केला जावा असे त्यांनी सांगितले. या बदलात सुसूत्रता असावी यासाठी ज्या पद्धतीने शक्य आहे, ती मदत करताना प्रशासनास पूर्व कल्पना देण्याचे आवाहन त्यांनी केले. संयोजन आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांनी केले. सूत्रसंचालन भागवत काटकर यांनी केले. आभार माऊलींदास महाराज यांनी मानले.
———————-