बुलढाणा (प्रशांत खंडारे) – क्रीडा विकास, नगरपालिका विद्यालयात सीबीएससी पॅटर्न, महिला व बाल कल्याण विभागातील आदिवासीं समाजाचा मुद्दा समोर ठेवत, धर्मांतरावर बंदी आणून ‘लव्ह जिहादवर’ कायदा करण्याच्या मागणीवर आमदार संजय गायकवाड आज, १६ मार्च रोजी विधीमंडळात चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी विधानसभेतील सभागृहात विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.
बुलढाण्याचे आमदार गायकवाड म्हणाले की, विभागीय क्रीडा संकुलाकरिता ५० कोटी, जिल्हा क्रीडा संकुल करिता २५ कोटी, तालुका क्रीडा संकुल करिता ५ कोटीचा निधी जाहीर केल्यानंतर त्याचा शासन निर्णयदेखील झालेला होता. परंतु त्याचा निधी वितरित न झाल्यामुळे ही कामे होऊ शकली नाही. शहरातील जिजामाता प्रेक्षागाराला डे- नाईटचे पहिले मैदान ज्याला फ्लड लाईट त्याच्यावरील गॅलरी हे सर्व त्यामध्ये प्रस्तावित आहे. या सर्व कामांना निधी देण्यात यावा. बुलढाणा शहरातील १० खेळाडू हे जागतिक खेळामध्ये गेल्या चार-पाच वर्षांमध्ये त्यांनी आठ वेळेस पार्टिसिपेट केले तसेच त्यांनी ७ गोल्डमेडल मिळवली, १० जणांची निवड त्या खेळामध्ये झाली. परंतु त्या खेळाडूंची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांच्याकडे जाण्या येण्यासाठी पैसा उपलब्ध नसतो. त्यांना साहित्य उपलब्ध नसते, त्यामुळे अशा खेळाडूंसाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, ही मागणीसुद्धा आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी केली.
तसेच शैक्षणिक विकासासंदर्भात ते म्हणाले की, बुलढाणा शहरांमध्ये बुलढाणा- मलकापूर रोडवर शिक्षण विभागाच्या ताब्यातील मार्मल स्कूलची जवळपास ५० वर्षापासूनची पडीक जागा असून, त्या जागेवर नगरपालिकेला सीबीएसई पॅटर्न सुरू करण्याकरिता ही जागा नगरपालिकेला हस्तांतरित करावी. डीएड येथील जागा नगरपालिकेच्या इमारती करता प्रस्तावित करावी, ही मागणीसुद्धा यावेळी गायकवाड यांनी केली. महिला व बालकल्याण विभाग व आदिवासींच्या बाबतीत डोंगरी विभागामध्ये १६ गावांचा समावेश करण्यात यावा, तसेच बुलढाणा हा आदिवासीबहुल जिल्हा आहे, परंतु कार्यालय अकोला येथे आहे, त्यामुळे हे कार्यालय बुलढाणा येथे देण्यात यावे, हीसुद्धा मागणी केली. दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी सभागृहामध्ये आक्रमक होत, मतदारसंघातील तसेच महाराष्ट्रातील अनेक उदाहरणे समोर ठेवून धर्मांतरावर बंदी आणून लव्ह जिहादवर कायदा करण्यात यावा ही मागणी केली.