बुलढाणा (प्रतिनिधी) – येत्या ९ एप्रिलला औरंगाबाद येथे ओबीसी अधिकारी, कर्मचारी संघाच्यावतीने एकदिवसीय चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळाचे व माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा आढावा बैठकीत करण्यात आली.
राजर्षी शाहू पतसंस्थेच्या मुख्यालयी १८ फेब्रुवारी रोजी संघटनेची बैठक संपन्न झाली. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष सुनील शेळके होते. तर राज्य सल्लागार डॉ. शिवशंकर गोरे, मुंबई विभागीय अध्यक्ष महादेव मिरगे, जिल्हाध्यक्ष किशोर पवार, महासचिव राम वाडीभष्मे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीमध्ये चिंतन शिबिर नियोजनाच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. सोबतच जिल्हा पातळीवर राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. यावेळी बोलतांना सुनील शेळके म्हणाले की, संख्येने मोठा असलेला ओबीसी समाज अजूनही अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. संघटनेच्यावतीने समाजातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरापर्यंत जाण्याचे लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक समस्यांवर ही संघटना सक्रियतेने काम करीत असून, वेळोवेळी कामाचा संबंधित स्तरावर पाठपुरावा करून समाजाला न्याय मिळवून देण्यात कटिबद्ध आहे.
दरम्यान, या बैठकीत संकेतस्थळाचा डेमो दाखविण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल हिस्सल, गजानन आमले, मुरली टेकाळे, विठ्ठल इंगळे, संजय खांडवे, जनार्दन तेजनकर, गणेश काकडे, गजानन पडोळ, गजानन राऊत, अनिल पवार, रविंद्र सावळे आदी उपस्थित होते.