साहित्य संमेलनातील `उत्सवी मग्न राजा`च्या कारभारात निवासाबाबत महिला पत्रकारांची कोंडी!
वर्धा (प्रकाश कथले) – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात `उत्सवी मग्न राजा`च्या कारभाराचे धिंडवडे समोर यायला लागले आहेत. मुंबईतून आलेल्या दोन महिला पत्रकारांना काल ऐन दुपारीच त्यांना दिलेले निवासस्थान रिकामे करायला लावले. जेथे निवासस्थान दिले होते, त्या निवासस्थान इमारत व्यवस्थापकाने दुपारनंतर ही जागा लग्नसमारंभाकरीता दिली असल्याचे कारण दिले. त्या दोन्ही महिला पत्रकारांनी त्यांचे साहित्य निवासस्थानातून बाहेर काढले, पण त्यांना वर्ध्याची त्यांना पुरेशी माहिती नसल्याने अखेर नागपूरच्या काही पत्रकारांनी त्यांना साहित्य बाहेर काढायला मदत तर केलीच, पण त्यांना वर्ध्यातील एका लॉजमध्ये राहायला खोलीही बूक करून दिली. मुंबईच्या या महिला पत्रकार मुंबईतील मोठ्या दैनिकाच्यावतीने वार्तांकन करण्यास आल्या होत्या.
गैरसोयींच्या बाबतीत काही ठिकाणी कळसच होता. पण आपले काम निमूटपणे करीत हा सारा त्रास सहन करीत अनेकांनी वार्तांकन केले. पण आठवणीचा पेटारा मात्र त्यांच्या कायम स्मरणातच राहणार आहे. या महिलांना दिलेल्या खोल्या, या लग्नसमारंभाकरीता आरक्षित असल्याची चौकशी करण्याचे भान आयोजकांना न राहिल्याने ही समस्या निर्माण झाली होती. आयोजन मोठे होते, हे मान्य पण सभामंचावर ठाण मांडण्यातच तर काहींनी आपण छायाचित्रात कसे टिपले जाऊ, यातच काहींची धन्यता दिसली. श्रोत्यांच्या नजरेतून या बाबी सुटल्या नाही. त्याची दिवसभर चर्चा सुरू होती.
साहित्य संमेलनात साहित्याचा सूतराम संबंध नसलेल्यांचे अग्रभागी वावरणे, हे तर मन विषण्ण करणारेच होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर सौजन्यवान आहेत. त्यांना पुढे जाण्यापासून काहींनी रोखले होते. याबाबत त्यांच्या मुलीने माहिती दिल्यानंतर ही बाब समोर आली. याबाबतच्या चौकशीचे निर्देश विधान परिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोर्हे यांनी दिले आहे. याशिवाय, त्रुटींच्या काही बाबी समोर आल्या. `काहींचा तर कुटुंब रंगले संमेलनात तसेच नेत्यांच्या मागे पुढे वावरण्यात` असा सारा प्रकार समोर आला.
————