मुंबई (प्राची कुलकर्णी) – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात अनेक महिन्यांपासून सुरू असलेली धुसफूस अखेर निर्णायक वळणावर आली आहे. या दोन नेत्यांत गेल्या दोन तीन दिवसात उघड आरोप-प्रत्यारोप झाले आणि आज हा वाद विकोपाला गेल्याचे उघडकीस आले. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असून, हा राजीनामा थेट दिल्लीला पाठवलेला आहे. या राजीनाम्यावर आता काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर, आमच्याकडे बाळासाहेब थोरात यांचा कुठलाही राजीनामा आलेला नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरमध्ये सांगितले.
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदार संघातून थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता. ज्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. आज थोरात यांचा वाढदिवस असतानाच थोरातांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला. दुसरीकडे, थोरात यांच्यावर पक्ष कारवाई करू शकते, अशी चर्चा सुरू होत असताना त्यांनी राजीनाम्याचे शस्त्र उपसल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या राजकीय घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बाळासाहेब थोरात यांनी गटनेते पदाचा राजीनामा दिल्लीला पाठवला आहे. अजून हा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. नाना पटोले यांच्यासोबत काम करणे अशक्य आहे, अशा आशयाचे पत्र काँग्रेस अध्यक्षांना त्यांनी पाठवले होते. त्यानंतर काँग्रेसमधील धुसफूस बाहेर आली. त्यामुळे भविष्यात त्यांच्यासोबत काम करणे कठीण आहे. पक्षांतर्गत कोणताही निर्णय घेताना नाना पटोले आपल्याला विश्वासात घेत नसल्याचा आरोपदेखील थोरात यांनी पत्रात केला होता.
मला बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याबद्दल आताच कळालं असून ही दुर्दैवी बाब असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. थोरात यांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार असून काँग्रेस पक्ष वाढीसाठी सर्वकाही करणार असल्याचे ते म्हणाले. थोरात पक्ष सोडून जाणार नाही असंही चव्हाण म्हणाले.
दरम्यान, सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता नाना पटोलेंसोबत काम करू शकत नाही, असे आपण पक्षश्रेष्ठींना कळवले असल्याचेदेखील बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. नाना पटोले यांच्या मनात आपल्याबाबत खूप राग आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्यासोबत काम करणे कठीण आहे, असे थोरातांनी नमूद केले आहे. मात्र, आता थोरातांचा राजीनामा काँग्रेसचे हायकंमाड स्वीकारणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्याची पक्षश्रेष्ठींनी दखल घेतली आहे. प्रभारी एच के पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन थोरातांची समजूत काढणार असल्याची समोर आली आहे. तसेच, अंतर्गत वाद मिटवण्यासाठी प्रभारींना महाराष्ट्रात पाठवण्यात आले असल्याचेही सांगण्यात येत आहे.
————-
काय म्हणाले नाना पटोले…
बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला, याबाबत आपल्याला कोणतीही माहिती नाही. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, असे नाना पटोले यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. हायकमांड सगळ्या गोष्टीकडे लक्ष ठेऊन आहे. असे सांगत नाना पटोले यांनी पक्षांतर्गत वादाला बगल दिली.
—————
सत्यजीत तांबेंच्या उमेदवारीवरुन सुरू झाला होता वाद
बाळासाहेब थोरात यांनी दिलेला राजीनामा म्हणजे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सत्यजीत तांबेंनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर काँग्रेसने तांबे पिता पुत्रांवर निलंबनाची कारवाई केली. यावरून काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद सुरू झाले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही यासंदर्भात बोलताना नाराजी व्यक्त केली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांनी पत्र दिले होते.
———————-