– काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे यांचे केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र
चिखली (विनोद खोलगडे) – उद्योगपती अदानी यांचा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आल्याने केंद्र सरकारच्या अख्त्यारीत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) व भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी)चे मोठ्या प्रमाणात पैसे अदानी उद्योग समुहात अडकलेले आहेत. हे पैसे परत मिळावेत यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वात चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातील स्टेट बँकेसमोर काँग्रेसच्यावतीने आज दुपारी जोरदार सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रातील मोदी सरकारविरोधात तसेच अदानीविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
काँग्रेसच्या चिखली तालुका व शहर कमिटीच्यावतीने राहुलभाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर, शहराध्यक्ष अतहरोद्यीन काझी, किशोर सोळंकी, पप्पू जागृत यांच्यासह शहर व तालुक्यातून पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे आंदोलन उशीरापर्यंत सुरूच होते. स्टेट बँकेने अदानी समुहाला दिलेले २१ हजार कोटी रुपयांचे कर्ज तत्काळ वसूल करावेत, एलआयसीने अदानी समुहात गुंतवणूक केल्यामुळे एलआयसीचे ३३ हजार कोटी रुपये बुडाले आहेत. हे नुकसान भरून द्यावे, कारण हा पैसा ३९ कोटी गोरगरीब पॉलीसीधारकांचा आहे, स्टेट बँकेसह इतर बँकांचे ८० हजार कोटी रुपये अदानी समुहात कर्ज रूपाने अडकले आहेत, ते वसूल करण्यात यावे, या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी राहुलभाऊ बोंद्रे यांनी आपल्या भाषणात केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले. या आंदोलनामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक काहीकाळ प्रभावीत झाली होती. पोलिसांचा आंदोलनस्थळी कडेकोट बंदोबस्त होता.
————–