आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील रुद्राशक्ती संस्थेच्या वतीने गोर गरीब, गरजू लहान मुलांच्या खुल्या शाळेत विविध स्पर्धा घेत इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता उपक्रम राबवित अन्नदान करून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
स्पर्धेतील विजेत्या मुलांना तसेच सहभागी सर्व मुलांना वही, पेन, पेन्सिल स्वयंसेवकांचे वतीने वाटप करण्यात आले. त्यानंतर सर्वांना पोटभर खिचडी भाताची पंगत देत अन्नदान वाटप करण्यात आले. यासाठी सर्व मुलांसाठी मुलांसह लहान लहान स्वयंसेवकांनी आपापल्या परिने घरातील साहीत्य देऊन खिचडी भात बनवण्यास योगदान दिले. येणारी नवी पिढी ही एकमेकांचा हात हातात घेऊन पुढे चालण्यासाठी आणि एक उत्तम समाज निर्माण व्हावा यासाठी उपक्रम राबविण्यात आला. ही शिकवण या संस्थां मार्फत लहान मुलांना देण्यात आली.
या उपक्रमात नुतन नागरगोजे, शामबाला पोठरे, शालेय मुले अविष्कार बिनवडे, प्रथमेश पोटभरे, चैतन्य बांडे, कुनाल बाळबुद्धे, मयुर बिनवडे, गणराज अवचिते, कृष्णा अवचिते, श्रेयश पिंगट, स्वास्तिक, कुणाल, प्रेम तिडके, सुरज नागरगोजे यांनी खूप चांगले काम करीत समाजात एक आदर्श निर्माण केला. अशाच सवंगड्याना घेऊन या संस्थेच्या माध्यमातून दर रविवारी इंद्रायणी घाट,विश्रांतवड आदी ठिकाणी स्वच्छता करून स्वच्छतेची, देशसेवेची एक नवी परीभाषा यांच्यात रूजू करत आहे. यासाठी गोपी फड, श्वेता केंद्रे, वर्षा खाडे, आरती खाडे या स्वयंसेवकांची तसेच हितचिंतकांची मोठी मदत होत आहे. या उपक्रमाचे आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने विश्वस्त ज्ञानेश्वर घुंडरे, गोविंद ठाकूर पाटील आदींनी कौतुक केले आहे.