Head linesKARAJAT

कचरा करणार्‍यांवर कर्जतकरांची करडी नजर!

कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत नगर पंचायत हद्दीत स्वच्छतेचा जागर सुरू असताना शहराला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी कर्जत नगरपंचायत बरोबरच शहरातील नागरिकांचीसुद्धा असून जर नागरिकांनीच कचरा शहरात कुठेही टाकला तर कोणतीही यंत्रणा काहीही करू शकत नाही याचा प्रत्यय काल पहावयास मिळाला.

कर्जत शहरात गेली दोन वर्षात नागरिकांच्या लोक सहभागातून व नगर पंचायतच्या सहकार्याने कर्जत शहर स्वच्छ बनले आहे. मात्र स्वच्छतेच्या या चांगल्या कामाला नजर लागली आहे का असे म्हणावे लागत असून काल वालवड रोड वरील क्रिकेट ग्राउंड शेजारील मोकळ्या झुडपात एक ट्रॅक्टर भरून कचरा टाकण्यात आला. हा कचरा टाकत असतानाच सर्व सामाजिक संघटनेच्या एका श्रमप्रेमीने हे पाहिले व त्याचे फोटो व्हिडिओ काढले. हे फोटो शेरखान पठाण यांनी तातडीने श्रमप्रेमीच्या ग्रुप वर टाकले. काही मिनिटातच चक्रे फिरली, हा ट्रॅक्टर कोणाचा, कचरा कुठला, कचरा कोणी टाकला याचा शोध लावला असता अनेकांना धक्काच बसला. शेजारीच असलेल्या दादा पाटील महाविद्यालयात सुरू असलेल्या कामावरील कुशनच्या वेस्टचा, लाकडी फर्निचरचा प्लाऊड, सनमाईक, स्पंज असा हा कचरा होता. तातडीने विजयराव तोरडमल यांनी प्राचार्य संजय नगरकर यांना फोन करून सदर काम कोण पाहते आहे हे विचारत घडलेला प्रकार निदर्शनास आणून दिला. प्राचार्य नगरकर यांना शहरात स्वच्छतेचे सुरू असलेले काम माहीत असल्याने त्यांनी याचे गांभीर्य ओळखून तातडीने संबंधित ठेकेदाराकडे विचारणा केली, त्याने ही माहिती नसल्याने हा कचरा टाकल्याचे मान्य केले असता प्राचार्यांनी हा सर्व कचरा तातडीने उचलण्याच्या सूचना दिल्या. नगर पंचायतच्या वतीने अक्षय राऊत यांनी ही संपर्क साधला या ठिकाणी प्रतिनिधी पाठवला याशिवाय वेगवेगळ्या स्वच्छताप्रेमींनी यावर तातडीने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली. दादा पाटील महाविद्यालयात काम करणार्‍या संबंधित कॉन्ट्रॅक्टरने आता अंधार पडला आहे सर्व कामगार घरी गेलेले आहेत सर्व कचरा उद्या १२ वाजे पर्यंत उचलुन घेतो असे सांगत यापुढे असे करणार नाही असा शब्द दिला याबाबत प्राचार्य नगरकर यांनी ही हा प्रकार चुकीचा असून संबंधित कामगारांनी असे करायला नको होते आपण स्वत: उद्या याकडे लक्ष देऊन हा कचरा उचलून घेऊ असे आमच्या प्रतिनिधीस सांगितले.

कर्जत शहराला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी जरी नगर पंचायतची असली तरी नागरिकांनी आपले शहर स्वच्छ राहण्यासाठी स्वत:ही जागृत राहण्याची गरज आहे. दोन दिवसापूर्वीच कचर्‍यावरून नगर पंचायतला धारेवर धरण्यात आले होते. पण जर नागरिकच स्वच्छतेचे महत्व समजून न घेता अशा पद्धतीने वागणार असतील तर नगर पंचायतची यंत्रणा तरी काय करू शकते? असा प्रश्न उभा राहत आहे. प्रशासकीय यंत्रणाना अनेक मर्यादा असतात ती काम करणारे ही माणसे असतात त्यामुळे आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वात प्रथम नागरिकांची असून त्याकडे कर्जतकर गांभीर्याने पाहतील अशी अपेक्षा आहे.


कर्जत शहरात स्वच्छता प्रेमीची, श्रमप्रेमीची मोठी फौज सदैव जागरूक असून त्याची नजर आपल्या कचरा टाकणार्‍या हातावर कधी व कशी पडेल हे सांगता येत नाही, त्यामुळे नागरीकांनी शहरात कुठेही कचरा न टाकता आपल्या घरातील कचरा, व्यवसायाचा कचरा नगर पंचायतच्या घंटागाडीतच टाकने आवश्यक आहे. अन्यथा अशा बेजबाबदार व्यक्तीवर कारवाई सुध्दा केली जाऊ शकते. नुकतेच शहरातील लावलेल्या झाडाच्या जाळ्या नेणार्‍या व्यक्तींना शोधून त्याचे कडून अतिरिक्त जाळ्या वसूल करण्यात आल्या असून कर्जत शहरात असच्छता करणार्‍या व्यक्तीवर ही श्रम प्रेमी चे तर लक्ष आहेच मात्र इतर नागरिकांनी ही जागृत होऊन लक्ष ठेवण्याची व असे गैरकृत्य करणार्‍यांना उघड करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!