मुंबई (प्रतिनिधी) – मुंबईतील दहिसर परिसरात अग्निशमन दलाच्या भरतीवेळी मोठा गोंधळ उडाला असून, ही भरती प्रक्रिया वादाच्या भोवर्यात सापडली आहे. यामध्ये अपात्र ठरविण्यात आलेल्या अनेक महिला उमेदवारांनी मैदान परिसरातच आंदोलन सुरू केल्याने काहीकाळ गोंधळ उडाला होता. या महिला व मुलींवर पोलिसांनी लाठीमार केल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अग्निशमन दलाने घालून दिलेल्या उंचीच्या नियमापेक्षा अधिक उंची असूनही आम्हाला डावलण्यात आले, असे तरुणींनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले आहे. या महिला व मुलींना शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पांिठबा देण्यात आला असून, ही वादग्रस्त भरती प्रक्रिया रद्द केली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारासुद्धा शिवसेनेने दिला आहे.
गोपीनाथ मुंडे शक्ती मैदानावर ही भरती प्रक्रिया सुरू असून, राज्यभरातून महिला उमेदवार भरतीसाठी आल्या आहेत. मात्र, भरतीमध्ये खाऊगिरी होत असल्याचा गंभीर आरोप अपात्र ठरविलेल्या महिला उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे या संतप्त महिलांनी धरणे आंदोलन सुरू करताच त्यांना हटविण्यासाठी त्यांच्यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भरती प्रक्रियेत १६२ सेंटिमीटर उंचीची अट ठेवण्यात आली. मात्र, त्यापेक्षा उंची कमी असल्याचे सांगत अनेक मुलींना अपात्र ठरवण्यात आले. महिला उमेदवारांनी हा दावा फेटाळून लावला. तसेच उंची भरत असतानाही अपात्र ठरविण्यात आल्याचा आरोप केला. यानंतर संतप्त मुलींनी मैदान परिसरातच घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली होती.