आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील देहू आळंदी मधून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी जनजागृतीच्या कार्याचा भाग म्हणून आळंदी देहू आळंदी या मार्गावर इंद्रायणीचे दुतर्फा असलेल्या गावांतून सायकल रॅली काढून युवक तरुणांनी संत संगम भेट सायकल रॅलीस प्रतिसाद मिळाला. या मध्ये दहा ते पंच्याहत्तर वय वर्षाचे नागरिक सहभागी झाले होते.
आळंदी नगरपरिषद, आळंदी व देहू संस्थान, आळंदी पत्रकार संघ, आळंदी पंचक्रोशीतील सेवाभावी संस्था, नागरिक यांचे वतीने आळंदी ते देहू ते आळंदी या मार्गावर जनजागृती साठी सायकल रॅलीचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या संत संगम भेट सायकल रॅली ची सुरुवात इंद्रायणी नदी घाटावर आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या हस्ते झाली. या प्रसंगी माजी नगरसेवक डी.डी. भोसले पाटील, आनंदराव मुंगसे, ॲड. विलास काटे, विठ्ठल शिंदे, अजित वडगांवकर, किशोर तरकासे, ॲड.नाझीम शेख, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर, कोमल काळभोर, डॉ.सुनिल वाघमारे, शिरिष कारेकर, दादा भालेराव, जनार्दन पितळे, विष्णू घुंडरे, राहूल चव्हाण, संदीप महाराज लोहर, निसार सय्यद आदी उपस्थित होते.
आळंदी मार्गे रॅली देहूफाटा, डुडूळगाव, मोशी, चिखली, विठ्ठलवाडी मार्गे देहूत संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितिन महाराज मोरे यांनी रॅलीचे स्वागत केले, यावेळी इंद्रायणी नाडीची आरती आणि नदी स्वच्छता करण्यात आली. देहू येथून परतीचे मार्गात रॅली विठ्ठलवाडी, तळवडे, चिखली, मोई, चिंबळी, केळगाव मार्गे आळंदीत आली. इंद्रायणी नदी घाटावर आरती, पसायदानाने रॅलीची सांगता झाली.