– खुनामागे पैशाचे कारण, की आणखी काही नाजूक बाब?
बुलढाणा (एकनाथ माळेकर) – मेहकर पोलिस ठाणे हद्दीतील हिरवड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजरच्या हत्येप्रकरणी मेहकर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच या गुन्ह्यात आरोपीला मदत केली म्हणून त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गणेश देशमाने, रा. चिखली असे या आरोपीचे असून तो एका लॉजचा माजी व्यवस्थापक आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने नोकरी सोडली होती. तर हा देशमाने या बँक मॅनेजरच्या संपर्कात होता. त्यानेच त्यांना थर्स्टी फर्स्टच्या रात्री दारूची सामिष पार्टी देण्याच्या नावाखाली सारंगपूर शिवारात नेले होते. तेथेच दारू पाजून गळा चिरून हत्या केली होती. या हत्याकांडाचे नेमके कारण पुढे आले नसले तरी, यामागे काही नाजूक कारण आहे का? या दिशेने संशयाची पाल चुकचुकत असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.
लोणार तालुक्यातील हिरवडमधील एसबीआयमध्ये कार्यरत असलेले परिविक्षाधीन शाखा व्यवस्थापक उत्कर्ष पाटील (वय ३५ वर्षे) यांची ३१ डिसेंबरच्या रात्री धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. तर १ जानेवारी रोजी सायंकाळी सारंगपूर शिवारातील एका शेतालगतच्या नाल्यामध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. यानंतर मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी मृतदेह आढळलेल्या नाल्यानजीकच्या शेतामध्ये रक्त लागलेले धारदार शस्त्र तसेच मृताचा एक बुट पडलेला दिसला. यावरुन पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरोधात भादंवि कलम ३०२, २०१ अंतर्गत गुन्हा दाखल करुन संशयित आरोपीसह त्याच्या पत्नीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस या दोघांकडून कसून तपास करत आहेत. केवळ तीनच महिन्यांपूर्वी मुंबईहून हिरवड भागात नोकरीसाठी आलेल्या उत्कर्ष पाटील यांची गणेश देशमाने याने हत्या का केली? त्याचा उद्देश काय होता? हत्या करताना आरोपीला अजून कुणी मदत केली का? याचा तपास करत असल्याची माहिती मेहकर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली. त्यामुळे हा खून थर्टी फर्स्टच्या पार्टीतून झाला की आणखी वेगळ्या कारणाने झाला, याचे रहस्य उलगडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
उत्कर्ष पाटील हे मूळचे मुंबईचे रहिवासी होते आणि ते मेहकर येथील एका लॉजमध्ये ते राहात होते. तेव्हाच त्यांची या लॉजचा व्यवस्थापक गणेश देशमाने याच्यासोबत ओळख झाली होती. देशमाने याने उत्कर्ष पाटील यांची हत्या केल्याचा अंदाज पोलिसांना तपासादरम्यान आला. त्यानंतर पोलिसांनी गणेश देशमानेला औरंगाबाद-पुणे महामार्गावरुन काल (४ जानेवारी) सायंकाळी अटक केली. हत्या केल्यानंतर हा देशमाने हा त्याच्या घरी गेला होता. रक्ताने माखलेले कपडे मेहकर शहराच्या बाहेर विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्या पत्नीनेही मदत केल्याचे तपासात आढळले. यानंतर पोलिसांनी आरोपीच्या पत्नीलाही अटक केली आहे. अधिक तपास मेहकर पोलिस करत आहेत.
——————-