अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेसाठी ‘दादा पाटील क्रीडा नगरी’ सज्ज
कर्जत (प्रतिनिधी) – अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धा ६ जानेवारीपासून कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात होणार असून, याची जय्यत तयारी महाविद्यालयाकडून करण्यात आली आहे. कर्जतसारख्या ग्रामीण भागात प्रथमच ही स्पर्धा होत असल्याने त्यासाठी दादा पाटील क्रीडा नगरी यासाठी सज्ज आहे. प्रथमच विद्यापीठाच्या इतिहासात ही स्पर्धा कर्जत येथे आमदार रोहित पवार यांच्या प्रेरणेतून होत आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीची पाहणी त्यांनी स्वतः केली. तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, प्राचार्य, महाविद्यालयाचे प्राध्यापक, माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य, सर्व सामाजिक संघटनेचे सदस्य हे देखील सातत्याने स्पर्धेच्या तयारीवर लक्ष ठेवून आहेत.
या स्पर्धेसाठी नाव नोंदणी सुरू असून ५ तारखेपर्यंत सर्व १६० विद्यापीठे व २००० कुस्तीपटू मुली तसेच संघ व्यवस्थापक या स्पर्धेसाठी येणार आहेत. या स्पर्धेसाठी येणार्या सर्व खेळाडूंची महाविद्यालयाच्यावतीने सोय करण्यात आलेली आहे. रयत संकुलातील दादा पाटील महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, कन्या विद्या मंदिर आदी शाळांच्या वर्ग खोल्या मध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये व्हेंडर मशीन, सॅनिटरी नॅपकिन सुविधा, डिस्पोजल मशीन, वैद्यकीय सोयी-सुविधा, प्रवास व्यवस्था अशा विविध प्रकारच्या सोयी-सुविधा ही महाविद्यालयाच्या वतीने खेळाडूंना देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणार्या १०० पंच व तज्ञांची मोफत निवास व भोजनाची व्यवस्था महाविद्यालयांच्या वसतिगृहामध्ये करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी दिली.
दादा पाटील महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या २३ विविध समित्या बनविल्या असून, कुस्ती स्पर्धा दोन सत्रात खेळविल्या जाणार आहे. सकाळी ९ ते १२ तर दुपारी ४ ते ९ या कालावधीमध्ये प्रकाशझोतात संपन्न होणार आहे. एकाच वेळी ४ कुस्त्या क्रीडा शौकिनांना पहावयास मिळणार असून, यासाठी जवळपास दीड हजार प्रेक्षक गॅलरीतून ते पाहू शकतील, अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्या खेळाडूच्या मनोरंजनासाठी लोककला सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीची माहिती देणार्या १४ चलचित्र स्पर्धकांना दाखविण्यात येणार आहे. यामध्ये दादा पाटील महाविद्यालयाच्या कामकाजाच्या योगदानाची माहिती देणारी एक डॉक्यूमेंट्री ही दाखवली जाणार आहे. दादा पाटील महाविद्यालयाची जडणघडण विकासात्मक बदल यातून पहावयास मिळणार आहे.
सर्व खेळाडू, कोच यांच्या आरोग्याची जबाबदारी जिल्हा रुग्णालय आणि तालुका आरोग्य केंद्र यांच्याकडे देण्यात आली आहे. वाहतूक आणि खेळाडूंच्या संरक्षणासाठी कर्जत पोलीस, होमगार्डचे जवान, आजी-माजी सैनिक संघटना आणि एनसीसीचे छात्र पार पाडणार आहेत. तर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी शहरात श्रमदान करणारी सर्व सामाजिक संघटनाचे श्रमप्रेमी, नगरपंचायत कर्जत यांचे सहकार्य मिळणार आहे. तर स्पर्धा यशस्वीपणे राबविण्यासाठी समस्त कर्जतकर आणि दादा पाटील महाविद्यालयाचा कर्मचारी वृंद, आजी- माजी विद्यार्थी संघटना, सर्व पत्रकार बांधव, रोटरी क्लब, तालुका क्रीडा संघटना विशेष परिश्रम घेत आहेत. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाचे क्रीडा संचालक दीपक माने, दादा पाटील महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ.संतोष भुजबळ, प्रा.शिवाजी धांडे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, एनसीसी विभाग, एनएसएस विभाग, कमवा आणि शिका योजनेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, माजी विद्यार्थी संघटना, सर्व सामाजिक संघटना, नगरपंचायत हे सर्वजण वेगवेगळी जबाबदारी पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत. स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असून संघ कर्जतला येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामधील मेंगलोर विद्यापीठ, रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ, हरियाणा, पंजाब यांसह १० टीम कर्जत येथे पोहोचलेल्या असून सर्वच १६० टीम आज दि ५ जाने संध्याकाळपर्यंत कर्जत येथे पोहोचतील. या सर्व खेळाडूंचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय नगरकर यांनी दिली.
शिवधनुष्य दादा पाटील महाविद्यालयाने उचलले!
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला कुस्ती स्पर्धेसाठी प्रत्येक सहभागी खेळाडूस प्रमाणपत्र मिळणार असून, विजेते, उपविजेत्या खेळाडूंना क्रीडा प्राविण्य क्षेत्रातून राखीव कोटा उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयात प्रथमच ही स्पर्धा होत असून, कर्जतसारख्या सर्व समावेश परिपूर्ण सुविधाची कमतरता असताना ही स्पर्धा यशस्वी पार पाडण्याचे शिवधनुष्य दादा पाटील महाविद्यालयाने उचलले आहे हे विशेष.
—————–