लाचखोर उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे बुलढाण्यातही रंगेहाथ जाळ्यात; वकील, आणि लिपिकालाही अटक, एसीबीच्या कारवाईने जिल्हाधिकारी कार्यालय हादरले!
– मोताळ्यातील वकील अनंत देशमुखांमार्फत स्वीकारली लाचेची रक्कम!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – सुमारे एक लाख रुपयांची लाच स्वीकारतांना भूसंपादन विभागाचा उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने रंगेहाथ पकडले आहे. या लाच प्रकरणात लिपीक नागोराव खरात यालाही ताब्यात घेण्यात आले असून, धक्कादायक बाब म्हणजे, मोताळा येथील वकील अनंत देशमुख यांच्यामार्फत ही लाच स्वीकारण्यात आली. आज सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात हा सापळा यशस्वी झाला. भिकाजी घुगे हा लाचखोरीत नेहमीच वादग्रस्त राहिलेला असून, यापूर्वी तो उस्मानाबादला जिल्हा पुरवठा अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी असताना, त्याला नवीन रॉकेल परवाना देण्यासाठी १२ हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लिपिकासह अटक झाली होती. तसेच, नांदेड येथे महसूल कर्मचारी भरतीमध्ये गैरव्यवहारप्रकरणीदेखील घुगे याचे निलंबित झाले होते. एखाद्या सराईत गुन्हेगारासारखा तो सराईतपणे लाचखोरीच्या प्रकरणात अडकत असताना, शासन त्याच्यावर मेहेरबान कसे? असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे.
जिगाव येथील भूसंपादनाच्या प्रकरणात ही कारवाई झालेली आहे. जिगाव प्रकल्पामध्ये हिंगणे इच्छापूर येथील एका शेतकरी तक्रारदाराच्या वडिलांची जमीन भूसंपादीत करण्यात आलेली आहे. दीड एकरच्या या जमिनीचा मोबदला सरकारकडून जमा झाला. दरम्यान, तक्रारदाराचे वडील मयत झालेले असून, मोबदल्याची रक्कम तक्रारदाराच्या चुलत्याच्या खात्यावर जमा झाली. अर्थात ही चूक भूसंपादन विभागाची होती. तक्रारकर्त्याच्या वडिलांचे नांव ‘रविंद्र’ होते आणि चुलत्याचे ‘राजेंद्र’ आहे. रविंद्रच्याऐवजी राजेंद्र झाल्यामुळे रक्कम तक्रारकर्त्याला मिळत नव्हती. जी चूक भूसंपादन विभागाने केली, त्याच्याच दुरुस्तीचे तक्रारदार शेतकर्याकडून एक लाख रुपये लाचेच्या स्वरुपात उपजिल्हाधिकारी घुगे याने मागितले. लिपिकामार्फत ही रक्कम वकील अनंत देशमुख यांना देण्याचे ठरले. तक्रारदाराने इकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती दिली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. आज सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास एक लाख रुपये घेवून तक्रारदार शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात पोहोचला. वकील अनंत देशमुख आणि लिपीक नागोराव खरात यांनी रक्कम स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या पथकाने उपजिल्हाधिकारी घुगे, लिपीक खरात आणि वकील देशमुख या तिघांनाही पकडले. तिन्ही आरोपींविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही कारवाई वाशिम येथील डीवायएसपी श्री कदम, पीआय भोसले, बुलडाणा विभागाचे पीआय सचिन इंगळे, एएसआय भांगे, हेडकॉन्स्टेबल साखरे, पोलीस नाईक लोखंडे, पवार, बैरागी आदिंनी यशस्वीरित्या पूर्ण केली. या कामगिरीबद्दल एसीबीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
हा भिकाजी घुगे हा वारंवार लाचखोरीत सापडत असून, यापूर्वी २०१४ मध्ये उस्मानाबाद येथे जिल्हा पुरवठा अधिकारी पदावर कार्यरत असतांना त्याला १२ हजार रुपयांची लाच स्विकारतांना उस्मानाबाद एसीबी पथकाने पकडले होते. एका बचतगटाला केरोसीनचा परवाना देण्यासाठी घुगे यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती १२ हजार रुपयांत काम करण्याचे ठरले होते. लिपीक विजय अंकुशे याने ही रक्कम स्विकारली होती. तेव्हा सापळा रचून बसलेल्या एसीबीपथकाने घुगेला रंगेहाथ पकडले होते. घुगे हा सराईत लाचखोर असल्याचे त्याच्या संदर्भातील वारंवारच्या घटनांतून निदर्शनास येत आहे.
हाच घुगे जालना येथे तहसीलदारपदावर कार्यरत असताना २००८ मध्ये हिंगोली येथे उपजिल्हाधिकारी पदावर बदली झाली. तत्पूर्वी नांदेड येथे महिला कर्मचार्याला अपशब्द वापरल्याने घुगे याला चांगलाच चोप देण्यात आला होता. तसेच नांदेड येथे असतानाच २००७-२००८ मध्ये महसूल कर्मचारी भरतीप्रकरणी गैप्रकाराच्या तक्रारी वाढल्याने त्याची विभागीय चौकशी होऊन त्याला निलंबित करण्यात आले होते. या वेळी त्याला विभागीय आयुक्तालयामध्ये संलग्न करण्यात आले होते. तेथे वर्षभराचा कालावधी काढल्यानंतर त्याने विशेष प्रयत्नातून हिंगोली येथे नियुक्ती मिळवली होती. आता बुलढाणा येथेदेखील तो लाचखोरीत सापडला आहे.
——————