माजी मंत्री आ. अनिल देशमुख तुरूंगातून बाहेर!
– स्वतः अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे स्वागताला हजर
– फुलांची उधळण करत, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा तुरूंगाबाहेर जल्लोष
मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. अनिल देशमुख अखेर आज कारागृहातून बाहेर आलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन दिग्गज नेते व शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या स्वागतासाठी आर्थर रोड कारागृहाबाहेर हजर होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अनिल देशमुखांचे स्वागत केले. कथित १०० कोटींच्या वसुली प्रकरणात देशमुखांना अटक झाली होती. तब्बल १४ महिन्यांचा वनवास भोगून ते कारागृहातून बाहेर पडले. कोर्टाची ऑर्डर तुरुंगाधिकार्यांना मिळाल्यानंतर त्याची संपूर्ण पूर्तता पार पडल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता अनिल देशमुख हे तुरुंगातून बाहेर आले. एक वर्ष १ महिना आणि २७ दिवस त्यांना तुरुंगात रहावे लागले.
नेते व कार्यकर्त्यांनी देशमुख यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. देशमुख यांच्यावर फुलांची उधळण करत कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेतले. दरम्यान, मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आले आहे. परमवीर सिंह यांनी माझ्यावर शंभर कोटींचा आरोप लावला. पण त्याच परमवीर सिंह यांनी कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिले, त्यामध्ये मी ऐकीव माहितीच्या आधारावर आरोप केला होता, माझ्याकडे कोणताही पुरवा नाही, असे प्रतिज्ञापत्रात सांगितले होते, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी तुरुंगाबाहेर आल्यानंतर दिली. यावेळी देशमुख यांनी सचिन वाझे याच्यावरही वक्तव्य केले. त्याशिवाय, न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील म्हणाले, की अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक करून सत्तारुढ केंद्र सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आणण्यासाठी अनेक कारवाया झाल्या. त्यापैकी या दोन कारवाया आहेत. न्यायदेवतेने आज न्याय केल्याचे आजचे चित्र आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी वसुलीचे आदेश दिले होते. या आरोपांची सीबीआय आणि ईडी तपास करत आहे. या प्रकरणात ऋषिकेश देशमुखदेखील सक्रिय असल्याचा आरोप आहे.
ईडी आणि सीबीआय दोन्ही जामीन मंजूर!
ईडी आणि सीबीआय दोन्ही संस्थांच्या आरोपांमध्ये अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. १२ डिसेंबररोजी मुंबई हायकोर्टाने अनिल देशमुख यांचा जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआयने या जामिनाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आता ही याचिका कोर्टाने फेटाळल्याने आज त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला.
——————