Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव निलंबित!

सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांना निलंबित करण्याची कारवाई आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केल्यामुळे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग चांगलाच हादरून गेला आहे. नवीन आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब लावल्याने सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे समजत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील २२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ६८ उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाबाबत सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ.सावंत बोलत होते. सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्राचा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने नामंजूर झाला आहे. पुन्हा प्रस्ताव सादर करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना बर्‍याचवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र परिपूर्ण प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. या कारणामुळे डॉक्टर जाधव यांना चांगलाच दणका आरोग्य मंत्री यांनी दिला असल्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाने धक्का घेतला असल्याचे दिसत आहे.

राज्यातील नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असताना गरजा वाढत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रासाठी पदभरती, मशिनरी, अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. शिवाय, या मोहिमांच्या कामासाठी सर्वकष कृती आराखडा तयार करणार असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधानपरिषदेत सांगितले. आरोग्य विभागामध्ये रिकाम्या जागा असल्याबाबत उपप्रश्नाला उत्तर देताना डॉ सावंत यांनी सांगितले की, आरोग्य विभागाची बिंदूनामावली तयार करण्याचे काम अंतिम टप्यात असून, जागा भरण्यासाठी जानेवारीमध्ये जाहिरात काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय, कंत्राटी तत्वावरील एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी यांना शासकीय सेवेत सामावून घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले. शिवाय, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या दरात वाढ करण्यासाठी आरोग्य विभागाच्या सचिवांची समिती नेमून अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही एका उपप्रश्नाला उत्तर देताना डॉ. सावंत यांनी सांगितले. राज्यातील पीएचसीबाबत लोकप्रतिनिधीची बैठक घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र मान्यतेबाबत निर्णय घेण्याचे निर्देश प्रभारी सभापती डॉ नीलम गोर्‍हे यांनी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, नरेंद्र दराडे, अभिजित वंजारी, गोपीचंद पडळकर, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!