सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यातील वाळूतस्करीची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी!
– दोषींवर कठोर कारवाईचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश
– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने वारंवार केला होता वाळूतस्करीचा भंडाफोड!
बुलढाणा (एकनाथ माळेकर) – सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील वाळूतस्करीबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने वारंवार आवाज उठवून ही वाळूतस्करी पुराव्यानिशी चव्हाट्यावर आणली होती. तसेच, मध्यरात्री वाळूतस्करांच्या गाड्यांचा पाठलाग करून त्याचे व्हिडिओच प्रसारित करून महसूल प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले होते. या कोट्यवधीच्या वाळूतस्करीप्रश्नी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आज विधानसभेत लक्ष्यवेधी सूचना मांडली. हे प्रकरण यापूर्वीच महसूलमंत्र्यांच्यादेखील कानावर गेलेच होते. त्यामुळे आ. गायकवाड यांच्या लक्ष्यवेधीवर उत्तर देताना, सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील वाळूतस्करीची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येईल. तसेच, जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच, त्यांनी या वाळूतस्करीच्या सखोल चौकशीचे व दोषींवर कठोर कारवाईचे आदेशदेखील अमरावती विभागीय आयुक्तांसह बुलढाणा जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी आज (दि.२६) नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील अवैध रेती उपसासंदर्भात लक्ष्यवेधी सूचना मांडली. देऊळगावराजा व सिंदखेडराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीपात्रातून सुरू असलेल्या वाळूतस्करीवर त्यांनी प्राकर्षाने भाष्य केले. आ. गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा व सिंदखेडराजा या तालुक्यातून जाणार्या खडकपूर्णा नदीचा उल्लेख करून तिच्या पात्रामध्ये जी मोठ्या प्रमाणावर अवैधरेती उत्खनन होत होत आहे, तरीही दोषीवर कारवाई होत नाही, त्याबद्दल महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रश्न उपस्थित केला. आ. गायकवाड म्हणाले, की तत्कालीन कमिश्नर यांनी चौकशी समिती गठित केली होती. नदीपात्रातून देऊळगावराजा, सिंदखेडराजा या खडकपूर्णा पात्रामध्ये लिलाव झालेल्या घाटात शासनाच्या नियमाचे उल्लंघन झालेले आहे, अशा प्रकारची टिप्पणी दिल्यानंतरसुद्धा कमिशनर यांनी त्यावर कारवाई केली नाही. नायब तहसीलदार देऊळगावराजा यांचा अवैध उत्खननाचा अहवालात त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेले होते की, मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये अवैध उत्खनन झालेले आहे. परंतु त्या ठिकाणचा नायब तहसीलदार वाळू माफियाशी संबंधित असल्यामुळे या सर्व गोष्टी घडवून आणत आहे, आणि त्यामुळे त्या ठिकाणी कारवाई होऊ शकली नाही. सुलतानपूर टाकरखेड भागिले येथील दोन शेतकर्यांनी त्या रेतीमाफियांना विरोध केल्यामुळे त्यांना चिरडून मारले गेले. या दोन शेतकर्यांना चिरडून मारल्यानंतरसुद्धा त्या रेतीमाफियांचे अवैध उत्खनन तेथून थांबलेले नाही, तसेच संबंधितावर अजून कारवाईसुद्धा झालेले नाही. या बाबतीमध्ये स्थानिक लोकांनी तक्रारी केल्या, आंदोलन केले, परंतु तेथील पोलिसांनीसुद्धा त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली नाही, ही सर्व घटना झाल्यानंतरसुद्धा एका वृद्ध शेतकर्याला रेती माफियांनी ५०० फूट फरफटत नेऊन चिरडून टाकले, तरीसुद्धा त्या ठिकाणी कारवाई झालेली नाही.
यावेळी बोलताना आ. संजय गायकवाड यांनी विधानसभेमध्ये सॅटॅलाइटने काढलेले रेती उत्खननासंदर्भात सर्व फोटो संबंधित मंत्री महोदयांना दाखवले. तसेच लोणार तालुक्यामध्येसुद्धा गैरमार्गाने वाळू उत्खनन होऊनसुद्धा कारवाई होऊ शकत नाही, यावर आ. गायकवाड यांनी संबंधित मंत्री महोदयांना प्रश्न उपस्थित केले. आ. संजय गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केलेले सर्व मुद्दे हे खरे आहेत. या सर्व प्रकरणाची निश्चितपणे सखोल चौकशी करण्याचे अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त यांना आदेश देण्यात येत आहे. यामध्ये जो दोषी असेल, त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित सर्व जिल्हाधिकार्यांना यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट सांगून, सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यातील वाळूतस्करीप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईचे आदेश अमरावती विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने उठविला होता आवाज
देऊळगावराजा, सिंदखेडराजा व चिखली तालुक्यातील वाळूतस्करीबाबत ब्रेकिंग महाराष्ट्रने वारंवार आवाज उठविला होता. तसेच, डिग्रस बुद्रूक येथील वाळूतस्करीही उघडकीस आणली होती. मेरा बुद्रूक परिसरातून रात्री दोन वाजेच्या सुमारास सुरु असलेली अवैध वाळू वाहतूकदेखील जीव धोक्यात घालून व वाळूतस्करांच्या गाड्यांचा पाठलाग करून चव्हाट्यावर आणली होती. देऊळगावराजा, सिंदखेडराजा तालुक्यातून जाणार्या खडकपूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी सुरू असून, महिनाकाठी कोट्यवधी रुपयांची वाळू खुलेआम चोरली जात आहे.
————–