खामगाव (तालुका प्रतिनिधी) – खामगाव येथील एकनिष्ठा जनसेवा फाउंडेशनची कृतीशील जनसेवा अनेक पीडितांना मोठा आधार धरत आहे. नुकतेच त्यांनी एका बेवारस वृद्धास जीवदान दिले तसेच त्यांनी अपघातात गंभीर जखमी युवकास तातडीची मदत दिल्याने त्याचे प्राण वाचू शकले.
सविस्तर असे, की अमित खत्री यांनी नुकतेच एकनिष्ठा जनसेवकांना कॉल करून सांगितले की, अग्रेसन चौकस्थित मंदिरासमोर एक अनोळखी आजोबा तीन दिवसांपासून बेवारस स्थितीत जमिनीवर पडलेले आहे. असे कळताच दिनांक १९ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता एकनिष्ठा जनसेवा फाऊंडेशन संस्थापक सुरजभैय्या यादव यांच्यासह करण सरडे, प्रदीप शमी, सिद्धेर्श्वर निर्मळ, लखन सारसर घटनास्थळी पोहचले. बेवारस वृध्दास विचारपूस केली असता त्यांनी अशी माहिती दिली, मी तीन दिवसांपासून येथे पडेल आहे, मला उठता येत नाही बसता येत नाही, आणि माझ्या शरीरात कुठलीही हालचाल होत नसल्याने मी लोकांना विनंती केली, की मला सामान्य रुग्णालयात नेऊन भरती करून द्या. माझ्या मागे पुढे कोणी नाही. माझे नाव तुकाराम किसन गव्हाळे वय ६० वर्ष राहणार लक्कडगंज भडभडी जीन खामगांव आहे. असे म्हणताच एकनिष्ठा फाऊंडेशनच्या जनसेवकांनी लगेच भगसिंग चौक येथील ऑटो चालक शर्मा यांना बोलावून त्यांच्या ऑटो रिक्षामध्ये बेवारस वृद्धास टाकून सामान्य रुग्णालयात नेऊन वार्ड क्रमांक १ मध्ये भरती करून दिले. सध्या वृद्धावर उपचार सुरू आहे, अशी माहिती सुरजभैय्या यादव यांनी दिली आहे.
तसेच, अन्य एका घटनेत, काल अपघातात गंभीर जखमी झालेल्या उमेश गणेश बुले वय १९ वर्ष राहणार जळका तेली तालुका खामगांव या रूग्णाच्या मेंदूला व तसेच मणक्याला जबरदस्त मार लागल्याने त्याला सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच एकनिष्ठा जनसेवा फाऊंडेशनचे सुरजभैय्या यादव, दीपक राऊत, रितेश पवार, विठ्ठल काटोले, रवी क्षीरसागर, सुरज गावंडे, संतोष बोचरे आदि तातडीने घटनास्थळी पोहोचले. रूग्णाची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला अकोला रेफर करण्यात आले होते. परंतु त्यांचा सिटीस्कॅन काढण्यासाठी बाहेर पाठविण्यात येत होते व रुग्णवाहिका पण मिळत नव्हती. एकनिष्ठा फाऊंडेशननी पुढाकार घेऊन रूग्णाचा सिटीस्कॅन सामान्य रुग्णालयात काढायला लावून व सामान्य रुग्णालयाकडून रूग्णवाहिका फ्रीमध्ये करून देऊन रूग्णास अकोला येथे पाठविण्यात आहे. अकोला मेडीकल कॉलेजमध्ये गेले असता डॉक्टरांनी नागपूर रेफर केले होते. रूग्णाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला येथील खासगी सुप्रसिद्ध डॉ. भागवत अकोला यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. सध्या रूग्ण उमेश बुले याच्यावर उपचार सुरू असल्याचे सुरजभैय्या यादव यांनी सांगितले आहे.
—————-