धरणाची उंची वाढवताहेत ते ठीकच; पण ‘खडकपूर्णा’चा डावा कालवा कधी होणार?
– वंजारीबहुल गावांना डाव्या कालव्यातून पाणी मिळणार आहे की नाही?; फडणवीसांच्या घोषणेचे काय झाले?
पुरूषोत्तम सांगळे
बुलढाणा/मुंबई – खडकपूर्णा नदीवरील बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा अर्थात ‘चोखा मेळा’ जलसागराची उंची वाढविण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. धरणाची उंची वाढली तर जलसाठाही वाढेल, त्यामुळे पिण्याचे व सिंचनासाठी पाणी हा प्रश्न सुटेल. परंतु, हे धरण बांधताना सिंदखेडराजा तालुक्यातील वंजारी समाजबहुल गावांवर जो अन्याय झाला, तो अन्याय हे सरकार दूर करणार आहे की नाही? की चिखली मतदारसंघात पाणी पळवताना राज्यकर्ते डाव्या कालव्याचा प्रश्न भिजत घोंगडेच ठेवणार आहे? हा संतप्त प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विधानसभा निवडणूक आली की राजकीय पुढार्यांना वंजारी समाजाची मते हवी असतात. परंतु, वंजारीबहुल गावांना हवा असलेला डावा कालवा कोणत्याच राजकीय पक्षाने पूर्ण केला नाही. फडणवीस यांनी घोषणा करूनही हा कालवा का पूर्ण केला जात नाही? असा कोणता सूड सिंदखेडराजा मतदारसंघातील राजकीय नेतृत्व उगवित आहे? असा संतप्त सवाल पाण्यावाचून वंचित ही गावे विचारीत आहेत. चिखलीचे नेतृत्व खडकपूर्णाचे पाणी पळवत असताना, सिंदखेडराजाचे नेतृत्व हातावर हात बांधून का बसले आहे?
मातृतीर्थ सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघातील खडकपूर्णा प्रकल्प ज्याला आपण संत चोखासागर म्हणतो. असे वाटले होते की, या धरणाच्या निर्मितीने या भागातील जमीन सुजलाम सुफलाम होईल. हजारो शेतकर्यांना हा प्रकल्प एक वरदान ठरेल, आणि तसे काहीअंशी झालेही. नदीच्या पात्रात कायम पाणी खेळते राहिले व नदीकाठच्या गावांना याचा फायदाही झाला. मात्र या भागातील नाकर्ते लोकप्रतिनिधींच्या दूरदृष्टीअभावी या प्रकल्पातले पाणी तत्कालीन मंत्री भारतभाऊ बोंद्रे यांनी चिखली मतदारसंघात पळवले, व सिंदखेडराजाचे लोकप्रतिनिधी हातबांधून व मूग गिळून गप्प बसले. ‘धरण उशाला व कोरड घशाला’ या पध्दतीने धरणाच्या हाकेच्या अंतरावर असलेले गावे पाण्यापासून वंचित राहिली आहेत. अगदी सहजतेने फक्त भुंड जरी फोडले तरी ओढ्याखोड्याने, बिगर खर्चिक नैसर्गिक पध्दतीने पाणी जाईल, अशी ही भौगोलिक गावे यांना पाणी मिळत नसताना, चिखली मतदारसंघात महागडी लिफ्टिंग यंत्रणा वापरून तिकडे पाणी नेल्या गेले. हे सर्व होत असताना सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी काय करत होते? वंजारी-मराठा हा वाद पेटवून आपली राजकीय पोळी भाजण्याऐवजी काही लोकप्रतिनिधींनी या मतदारसंघात खडकपूर्णाचे पाणी वळविण्यासाठी हालचाली का केल्या नाहीत?
त्यामुळे उशिरा का होईना या भागातील तरूणांनी भविष्यातील पाण्याची गरज ओळखून २०१६ साली सिंदखेडराजा तालुक्यातील वाघाळा या गावातील पवित्र वाघाळेश्वराच्या साक्षीने डावा कालवा आंदोलनाची ठिणगी पेटवली होती. या तरुणात प्रामुख्याने सुनील जायभाये, संजय घुगे, गजानन सानप, सुनील सोनुने, दत्ता नागरे, संदीप सोनुने या युवकांनी पुढाकार घेतला. त्यांना साथ म्हणून भगवानराव मुंढे, अभय चव्हान, डॉ. सुनील कायंदे, रमेशदादा कायंदे, अॅड. मधुकर सोनुने, तळेकर सर, भारत पाटील, प्रवीण गिते, भगवान नागरे, सुरेश गिते यांच्यासह अनेक जागृत नागरिकांनी ‘डावा कालवा संघर्ष समिती’ स्थापन करत, संघर्ष उभा केला. या समितीच्या माध्यमातून आंदोलन पेटत गेले. वाघाळा, पोफळ शिवनी, सावखेड नागरे, पाडळी, मेंडगाव, बायगाव, अंढेरा, सेवा नगर, धोत्रा, आरमाळ शिवनी, नागनगाव, डोरव्ही, मलकापूर पांग्रा या गावात जागृती होत गेली. त्यामुळे लोकांच्या मनात असलेला उद्रेक लोकशाहीमार्गाने बाहेर पडला व बुलढाणा जिल्ह्यातील इतिहासात सर्वात मोठा मोर्चा तब्बल ४० हजार शेतकर्यांचा देऊळगावराजा येथे निघाला होता. अंढेरा चौकीवर सुमारे १० हजार शेतकर्यांचे मोठे पाच दिवस उपोषण झाले. या आंदोलनाची दखल घेत, तत्कालीन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांना चर्चेला बोलावले होते. त्यांच्यासोबत पाच बैठका झाल्या. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोनवेळा बैठका झाल्या, व सरते शेवटी नागपूर हिवाळी अधिवेशनात तत्कालीन आमदार शशिकांत खेडेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी खेडेकरांना डावा कालवा भेट देत, कालवा मंजूर केला. परंतु, फडणवीसांनी घोषणा करूनही डावा कालवा अजूनपर्यंत झालेला नाही. अजूनही हा प्रश्न तसाच रेंगाळत पडलेला आहे. तर आजही डाव्या कालवा आंदोलनाची धग कायम आहे.
एकीकडे चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील या धरणाची उंची वाढवून पाणीसाठा वाढविण्याची मागणी करतात व ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने पूर्ण करत, तसे आदेशही देतात. परंतु, सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी डावा कालव्यासाठी मूग गिळून बसलेले असल्याने, या डाव्या कालव्यासाठी राज्य सरकार काहीही हालचाल करत नाही, अशी भीषण परिस्थिती राजकीय पातळीवर आहे. खडकपूर्णा धरणाची उंची वाढणे ही चांगलीच बाब असली तरी वंजारीबहुल गावांना डावा कालवा देणे, हीदेखील काळाची गरज आहे. केवळ मतदानापुरता वंजारी समाज वापरून शेती-सिंचन, व समृद्धीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची खेळीच या भागातील राजकीय नेतृत्वाने फार काळ खेळू नये. अन्यथा, डावा कालव्याची धग अजूनही कायम आहे, तिचा उद्रेक नजीकच्या काळात झाल्याशिवाय राहणार नाही.
खडकपूर्णाची उंची वाढविली जात आहे, त्यामुळे पाणीसाठा वाढेल. पण, सिंदखेडराजा तालुक्यातील गावांना डावा कालवा कधी मिळणार? हा प्रश्न आहे. जी गावे डावा कालवा मागत आहेत, ती वंजारी समाज बहुल आहेत. हा कालवा झाला तर खडकपूर्णाच्या पाण्याने ही गावे, या गावातील शेतकरी समृद्ध होतील. इकडच्या लोकप्रतिनिधी व राज्य सरकारला ही समृद्धी नको आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा करूनही हा कालवा होत नाही, मग झारीतील शुक्राचार्य कोण आहे? राज्य सरकारने तातडीने आपले आश्वासन पूर्ण करावे व डाव्या कालव्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा पुन्हा एकदा तीव्र आंदोलन उभे राहील.
– सुनील जायभाये, नेते डावा कालवा संघर्ष समिती
—————–