Breaking newsHead linesMaharashtraWorld update

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट दारावर!; महाराष्ट्रात काळजीचे कारण नाही!

– प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्याचे आदेश
– मास्क लावा, चाचण्या वाढवा, पंतप्रधानांच्याही राज्यांना सूचना

नागपूर (प्राची कुलकर्णी) – जगातून कोरोना वाढीच्या बातम्या कानावर येत असताना, केंद्र सरकारनेदेखील राज्यांना पत्र लिहून खबरदारी घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार, महाराष्ट्रातदेखील खबरदारी घेण्यात येत असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनीदेखील तातडीने सर्व जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन पंचसुत्रीचे काटेकोर पालन होईल, हे पाहण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातदेखील आरोग्य यंत्रणेने सतर्कतेच्या सूचना दिल्या असून, आरोग्य यंत्रणा सज्ज झालेली आहे.

दरम्यान, कोरोना अजून संपलेला नाही हे पुन्हा सिध्द झाल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळे व इतर ठिकाणी दक्षता वाढवावी. राज्यांनी कोरोना आरोग्य निर्देश लागू करण्यासह जीनोम सिक्वेन्सिंग आणि चाचण्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे, सर्वांनी मास्क आवर्जून वापरावा व ज्येष्ठ नागरिकांच्या बूस्टर लसीकरणावर विशेष भर द्यावा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आज नवी दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीत दिल्या आहेत.कोरोनाचे व्हेरियंटच्या बीएफ -७ या उप-व्हेरियंटचे चार रूग्ण गुजरातसह तीन राज्यांत आढळून आल्यावर देशभरात आरोग्य दिशानिर्देशांचे पालन करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ही उच्चस्तरीय बैठक घेतली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी, आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रुग्ण वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ-७ हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा यावेळी घेण्यात आला. राज्यासह देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असतानाच, राज्यात ९५ टक्के लसीकरण झाल्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे. तसेच, कोरोना आढावा बैठकीत केंद्राने काही निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे बीएफ-७ हे नवीन व्हेरियंट आहे. मात्र, तो धोकादायक नाही. महाराष्ट्रातील जनतेने घाबरण्याचे कारण नाही. काळजी घेणे आवश्यक आहे. ओमिक्रॉनचा एक रुग्ण ४ लोकांना बाधित करत होता, बीएफ-७चा रुग्ण १० जणांना बाधित करतो. तसेच, मास्कची सक्ती नाही. मात्र, वरिष्ठ नागरिकानी मास्क घालावे, असे आवाहनदेखील मंत्री तानाजी सावंत यांनी केलेले आहे.


कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा महाराष्ट्रात रुग्ण नाही!

जगातील चीनसह अन्य देशांत कोरोना विषाणूचा बीएफ-७ हा नवा प्रकार आढळून आला आहे. या प्रकाराचा महाराष्ट्रात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, दक्षता म्हणून मास्कचा वापर करीत, गर्दीत जाताना सुरक्षित अंतर ठेवावे, असे निवेदन राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत केले. मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या संसर्गाची तीव्रता ओमिक्रॉनपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आज दुपारी आढावा बैठक घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. तसेच कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर चाचणी, पाठपुरावा, उपचार आणि लसीकरणावर भर देण्यात येईल. आरोग्य यंत्रणांनाही सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात आतापर्यंत ९५ टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच येत्या सोमवारपासून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना नुसार आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणार्‍या दोन टक्के प्रवाशांची ताप चाचणी करण्यात येईल, असेही सावंत म्हणाले.


लग्न समारंभ, मेळावे पुढे ढकला; आयएमएच्या नवीन मार्गदर्शिकेत सूचना

१. प्रत्येकाने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालावे.
२. साबणाने हात धुवा, सॅनिटायझर वापरा.
३. सामाजिक अंतर पाळावे.
४. सार्वजनिक मेळावा टाळण्याच्या सूचना आयएमएने केल्या आहेत.
५. शक्य असल्यास आंतरराष्ट्रीय प्रवास टाळा.
६. सर्दी, खोकला, सर्दी यांसारख्या लक्षणांसाठी चाचणी घ्या.
७. लग्न समारंभ, मेळावा पुढे ढकलण्यात यावा, असे आवाहन ‘आयएमए’ने केले आहे.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!