भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात दाखल
– तब्येत चांगली असल्याची सौ. प्रतिभाताई पाचपुते यांची माहिती
– भावाच्या निधनानंतर आता कौटुंबीकदृष्ट्या माजी मंत्री, राज्याचा पोलादी नेता खचला?
श्रीगोंदा (अमर छत्तीसे) – राज्याचे माजी मंत्री, नगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांची तब्येत खालावली असून, त्यांना विधान भवनातून रुग्णवाहिकेत टाकून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बबनराव पाचपुते यांना आज दुपारी विधान भवनात श्वसनाचा त्रास सुरू झाला. मागील काही दिवसांपासून ते आजारी आहेत. सार्वजनिक जीवनातला त्यांचा वावरही कमी झाला आहे. मात्र अधिवेशनाच्या निमित्ताने ते नागपुरात आले आहेत. तथापि, साहेबांची तब्येत आता बरी आहे, अशी माहिती त्यांच्या पत्नी सौ. प्रतिभाताई पाचपुते यांनी दिली आहे. काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी त्यांच्या सरपंचपदाच्या उमेदवार अर्थात मुलाला पराभूत केले असून, त्यामुळे कुटुंबातील कलहाने ते काहीसे नाराज आहेत. वडिलबंधु सदाशिवअण्णा पाचपुते यांच्या निधनानंतर ते पहिल्यांदाच इतके हतबल दिसून येत आहेत.
आमदार बबनराव पाचपुतेंना आज त्रास सुरु झाल्यावर त्यांच्या सहकार्यांनी परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. त्यात त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. परंतु पाचपुतेंच्या विनंतीवरून त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तूर्तास त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यांना तीव्र दम्याचा त्रास झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
पाचपुते यांचे चिरंजीव प्रतापसिंह पाचपुते यांचा त्यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव केला आहे. त्यामुळे बबनराव पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसला असून, ते मानसिकदृष्ट्याही खचल्याचे दिसून येत आहे. बबनराव पाचपुते यांच्या राजकीय वाटचालीत त्यांचे भाऊ सदाशिवअण्णा पाचपुते यांचा मोठा वाटा होता. मात्र दोन वर्षांपूर्वी सदाशिवअण्णा यांचे निधन झाले. त्यानंतर पाचपुते कुटुंबात संघर्ष सुरू झाला आणि ग्रामपंचायत निवडणुकीत बबनराव पाचपुते यांच्या पॅनलला त्यांचे पुतणे साजन पाचपुते यांनी आव्हान दिले. त्यामुळे बबनराव पाचपुते यांच्यासाठी ही निवडणूक महत्वाची मानली जात होती. या पराभवाचाही त्यांच्या मनावर आघात झाल्याचे बोलले जात आहे.
प्रकृती ठीक आहे – डॉ.सौ.प्रतिभाताई पाचपुते
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनासाठी आ. बबनराव पाचपुते हे नागपुरात आले होते, पण आज सभागृह चालू असताना त्यांना श्वसनाचा त्रास झाला, म्हणून खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची तब्येत ठीक आहे. मी स्वतः नागपूर मध्ये आहे, अशी प्रतिक्रिया आ. पाचपुते यांच्या पत्नी डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते यांनी दिली आहे.
—————