Head linesPachhim Maharashtra

पालखीमार्गासाठी संपादीत जमिनीच्या मोबदल्यासाठी बोधेगाव येथे रस्ता रोको

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – पैठण-पंढरपूर पालखी मार्गावरील जमीन संपादित शेतकर्‍यांना मोबदला मिळण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी बोधेगाव येथे शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. संबंधित प्रश्न मार्गी न लागल्यास दि. २६ जानेवारी रोजी शेतकरी सामूहिक आत्मदहन करतील, असा इशारादेखील वंचित आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी दिला आहे.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव, मुंगी, हातगाव, लाडजळगाव, शेकटे खुर्द, या गावातून पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचे गेल्या पाच सहा वर्षांपासून काम सुरू आहे. परंतु रस्त्यासाठी जमीन संपादित केलेल्या शेतकर्‍यांना मोबदला मिळाला नाही, त्यामुळे शेतकर्‍यांनी काम बंद पाडले आहे. संबंधित ठेकेदार व अधिकारी हे प्रशासनाला हाताशी धरून कामात अडथळा आणणार्‍या शेतकर्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत, मुस्कटदाबी केली जात आहे. अधिकारी, ठेकेदार, लोकप्रतिनिधी यांची मिलिभगत असून, या प्रश्नावर कोणी बोलत नाही, असा आरोप आंदोलकानी केला आहे. हा प्रश्न मार्गी न लागल्यास लोकप्रतिनिधींना या भागात फिरकू देणार नाही व दि. २६ जानेवारी रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारादेखील यावेळी वंचित बहुजन आघाडीसह शेतकर्‍यांच्यावतीने देण्यात आलेला आहे.

बोधेगाव, हातगाव, लाडजळगाव, गोळेगाव, शेकटे खुर्द, मुंगी, भागातील संतप्त शेतकर्‍यांनी जमीनधारक शेतकर्‍यांना मोबदला मिळण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी बोधेगाव येथे रस्ता रोको आंदोलन केल्यामुळे हा मार्ग ठप्प झाला होता. पोलिस व प्रशासनाच्या विनंतीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, महिला आघाडी तालुकाध्यक्षा संगीता ढवळे, बन्नोभाई शेख, प्यारेलाल शेख, माजी सरपंच रामजी अंधारे, अशोक लाड, डॉ. निलेश मंत्री, धोंडीराम मासळकर, अरविंद सोनटक्के, आदित्य मोरे, गंगाभीषण घोरतळे, फारूक सय्यद, चांद शेख, बबन सय्यद, कारभारी नरोटे, किशोर मातंग, ईश्वर मोरे, राजेंद्र बनसोडे, अरविंद सोनटक्के, निलेश ढाकणे, गौतम भोंगळे, यांच्यासह भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यमान लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार यांचा धिक्कार यावेळी आंदोलकांनी केला.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!