आम्हाला कुणी पोरगी देत नाही! सरकारनेच हस्तक्षेप करावा!!
– सोलापुरात लग्नासाठी भावी नवरदेवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
– कुणी मुलगी देता का मुलगी?; भावी नवरदेवांच्या घोषणांनी परिसर दणाणला
सोलापूर (संदीप येरवडे) – सरकारी नोकरदार असलेल्या मुलांना कुणीपण मुली कोणीही देत आहे, परंतु सर्वसामान्य, शेतमजूर, शेतकरी कुटुंबातील मुलांना आज मुली मिळणे कठीण झाले आहे, अशा परिस्थितीमध्ये सरकारने या वर उपाययोजना करून, या प्रश्नात हस्तक्षेप करावा व हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करत मोहोळ तालुक्याचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांच्या नेतृत्वात भावी नवरदेवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आम्ही शेतकरी, शेतमजूर असल्याने आम्हाला कुणी मुलगी देत नाही, सरकारनेच यात हस्तक्षेप करून आम्हाला वधू प्राप्ती करून द्यावी, अशी मागणी या भावी नवरदेवांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे. मुंडवळ्या बांधून व घोडीवर बसून हे भावी नवरदेव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते.
सध्या मुलाचे वय होऊनदेखील मुली मिळणे कठीण झाले आहे. याबरोबरच मुलीच्या आई-वडिलांचे अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चांगले शिक्षण, नोकरी, शेती असावी अशी अपेक्षा असते. तर दुसरीकडे अनेक जणांकडे शेती, चांगली परिस्थिती असूनदेखील मुलगी मिळत नाही. त्यामुळे कुटुंबातील आई-वडील मुलगा हे डिप्रेशनमध्ये जात आहेत. सध्या देशात १ हजार मुलांमागे ८५० मुली आहेत. त्यामुळे गर्भलिंग निदान कायदा करूनदेखील त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे अनेक मुलांना मुलगी मिळत नाही. अनेक युवक लग्नासाठीची वयोमर्यादा ओलांडून गेली तरी त्यांची लग्ने होत नाहीत. त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बारसकर यांच्या नेतृत्वातील मोर्चेकरी भावी नवरदेवांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नवोदित वरांची वाजत गाजत वरात काढण्यात आली. यावेळी मुंडवळ्या बांधून व घोडीवर बसून भावी नवरदेव या आंदोलनात सहभागी झाले होते.
——————–