Breaking newsBULDHANAMEHAKARVidharbha

मेहकर-मालेगाव मार्गासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक!

– संबंधित जबाबदार अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
– जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टालेंसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात व सुटका
– आठ दिवसांत संपूर्ण मार्ग नव्याने करा, अन्यथा आणखी आक्रमक आंदोलन करू – डॉ. टाले

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर ते मालेगाव या मार्गाची अत्यंत दुरवस्था झाली असून, अनेक वाहनधारकांचे बळी या मार्गाने घेतले आहेत. हा मार्ग दुरुस्त करण्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वारंवार पाठपुरावा करून आंदोलनाचा इशारा दिला होता. तरीही काहीही हालचाल झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात डोणगाव येथे रस्ता रोको करत, संबंधित कामचुकार अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या रस्ता रोकोमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, पोलिस व आंदोलक यांच्यात शाब्दिक संघर्षही झाला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका केली.

आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राष्ट्रीय महामार्ग क्रं.७५३ सी मेहकर ते मालेगाव या रस्त्यावर जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सदर रस्त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना गेल्या एक वर्षापासून संबंधित विभागाकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा करत आहे. यापूर्वी राष्ट्रीय रस्ते व राजमार्ग प्राधिकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नवी दिल्ली अध्यक्षा व भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण औरंगाबाद विभाग महाव्यवस्थापक तांत्रिक विभाग यांना ई-मेलद्वारे निवेदन देऊन सदर रस्त्याचे तात्काळ काम सुरू करावे, अशी मागणी देखील करण्यात आली होती. अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्या अनुषंगाने आज सदर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आज शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर उतरून संबंधित प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत होते, व दोषी अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होते.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी सांगितले, की मेहकर ते मालेगांव रस्ता ब-याच दिवसापासून खराब झाला असून, या रस्त्यावर खूप मोठ मोठे खड्डे पडून संपूर्ण रस्ता उद्ध्वस्त झाला आहे. सदर रस्त्याने दररोज एक दोन अपघात घडतात. यामध्ये कित्येक नागरिकांनी, प्रवाशांनी आपला जीव गमावलेला आहे, तसेच बर्‍याच प्रवाशांनी अपघातामध्ये आपले हात पाय गमावून त्यांना गंभीर जखमी होऊन अपंगत्व आलेले आहे. या परिसरातील नागरिक, प्रवासी, वाहनधारक आपला जीव धोक्यात घालून त्या रस्त्याने प्रवास करतात. मात्र संबंधित राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व्यवस्थापक तांत्रिकी तसेच प्रकल्प संचालक विभाग औरंगाबाद यांना वेळोवेळी एक वर्षापासून पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. मागील निवेदनाच्या अनुषंगाने मागील वर्षी सदर रस्त्याची मागणीप्रमाणे तात्पुरते स्वरुपात डागडुजी करण्यात आली होती, त्यामुळे लगेच परत सर्व डागडुजी पूर्ण पणे उखडून गेली आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी त्यावेळी दुर्लक्षितपणा केल्यामुळे सदर काम अत्यंत निकृष्टपणे झाले होते. तरी या रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती न करता संपूर्ण रस्ता तात्काळ नव्याने सुरू करावा, या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावर उतरूण आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले आहे.

यावेळी संबंधित प्रशासनाच्या विरोधात तहसीदार यांना निवेदन देऊन कार्यवाही करण्यासाठी व पोलीस स्टेशनमध्ये कैफियत देऊन संबंधित अधिकार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीसुद्धा करण्यात आली. जर का संबंधित प्रशासनाने आठ दिवसाच्या आत सदर रस्त्याचे काम सुरू न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढील आंदोलन हे अत्यंत आक्रमक स्वरूपाचे करेल, व औरंगाबाद येथील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचे कार्यालय ठिकाणावर ठेवणार नाही, असा इशारा देखील आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. याप्रसंगी सदर आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील प्रवासी वाहनधारक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली होती. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. पोलिस व आंदोलक यांच्यात शाब्दिक चकमकदेखील उडाली. त्यामुळे जिल्हाध्यक्षांसह काही पदाधिकारी यांना अटक करण्यात येऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!