Head linesPachhim MaharashtraPolitical NewsPolitics

आमदार बबनराव पाचपुते यांच्या मुलाचा पराभव; पुतण्या साजनने मारली बाजी!

श्रीगाेंदा (अमर छत्तीसे) – श्रीगोंदा तालुक्याच्या राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या काष्टी गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव प्रताप यांचा पराभव झाला असून. स्वर्गीय सदाशिव आण्णा पाचपुते यांचे चिरंजीव साजन पाचपुते यांनीच हा पराभव केला असल्यामुळे आता पाचपुते कुटुंबात राजकीय कलह निर्माण होणार असल्याचे या निकालावरून दिसून येते. ग्रामपंचायत निवडणुकीत बबनरावांच्या पॅनलला साजन पाचपुते यांनी आव्हान दिले होते. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपची संपूर्ण यंत्रणा या निवडणुकीत प्रतापसिंहांच्या मदतीला धावली मात्र तरीही साजन पाचपुते यांनी वडील सदाशिव पाचपुते यांची पुण्याई व जनसंपर्काच्या बळावर त्यांना पराभूत केले.

श्रीगोंदा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी झाली, पण या मतमोजणीत सर्वाधिक लक्ष काष्टी ग्रामपंचायत निकाला कडे लागले होते. कारण आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबात बंधुविरुद्ध बंधु अशी लढत होण्याची पहिलीच वेळ होती, कारण आमदार बबनराव पाचपुते यांच्या राजकीय कारकिर्दीत खंबीरपणे साथ देणारे स्वर्गीय सदाशिव पाचपुते होते गावातील राजकारण असो अथवा तालुक्याचे सर्व काही सदाशिव आण्णा पाचपुते हेच पाहत होते. पण त्यांच्या जाण्याने राजकारणात ही पोकळी निर्माण झाली, याचा फायदा पाचपुते विरोधकांनी घेऊन आमदार बबनराव पाचपुते यांच्या मुलाविरूद्ध त्यांचाच पुतण्या साजन पाचपुते यांनी उमेदवारी केली व विजय ही संपादन केला. मात्र या निकालावरून आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबात आगामी काळात राजकीय कलह निर्माण होणार हे मात्र निश्चित.

आज झालेल्या मतमोजणीत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, साजन पाचपुते यांनी १६१ मतांनी सरपंचपद मिळविले. या ग्रामपंचायतील १७ जागा आहेत. त्यापैकी बबनराव पाचपुतेंच्या पॅनलने १० तर साजन पाचपुतेंच्या पॅनलने ७ जागा मिळविल्या आहेत. बबनरावांनी ग्रामपंचायतीवर सर्वाधिक जागा मिळविल्या असल्या तरी सरपंचपद गमावले आहे. त्यामुळे बबनराव पाचपुते यांचा १९८० पासून श्रीगोंदे तालुक्यावर असलेल्या बालेकिल्ल्याला खिंडार पडल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!