– काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) यांनीही ग्रामीण भागात सिद्ध केले वर्चस्व
– बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीचे १३० सरपंच, ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल
– जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात दगडफेकीत भाजप सदस्याचा मृत्यू
– हभप. इंदुरीकर महाराजांच्या सासुबाईही झाल्यात सरपंच
– परभणीत मतमोजणी सुरू असताना दोन गटात तुफान दगडफेक
मुंबई/बुलढाणा (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेस हा निर्विवाद क्रमांक एकचा पक्ष ठरल्याचे पुढे आले असून, ताजे अपडेट हाती येईपर्यंत 3298 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा मानणारे नेतृत्व सरपंचपदी निवड झालेले आहे. त्या खालोखाल भाजप हा पक्ष ठरला असून, 2482 ग्रामपंचायतीत त्यांचे सरपंच निवडून आल्याचा दावा भाजपने केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विचार मानणारे सरपंच तब्बल 1302 ग्रामपंचायतीत निवडून आले असून, काँग्रेस हा तिसर्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. एकूण राज्यात महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळाल्याचे चित्र या ग्रामपंचायत निवडणुकीतून दिसून आले.
बुलढाणा जिल्ह्यातदेखील महाविकास आघाडीने नेत्रदीपक यश प्राप्त केले असून, २५१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विचारधारेचे तब्बल १३० सरपंच निवडून आले असून, त्या खालोखाल भाजप विचारधारेचे ७० ग्रामपंचायतींवर सरपंच निवडून आले आहेत. जिल्ह्यात एकूण २७९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली होती. त्यात १८ ग्रामपंचायती पूर्णपणे बिनविरोध तर २१ गावांचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. यातील बहुतांश सरपंच व ग्रामपंचायती यादेखील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेला मानणार्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्या माध्यमातून माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. राहुल बोंद्रे यांची जिल्ह्यावरील पकड पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या विराट सभेने चिखली, देऊळगावराजा, मेहकर, सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील राजकीय वातावरण पालटले होते. त्यामुळे चिखली तालुक्यातील २८ पैकी २२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारधारेचे सरपंच निवडून आले असून, चिखलीनजीकच्या बुलढाणा तालुक्यातही पाच पैकी तीन सरपंच हे काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) विचाराचे निवडून आले आहेत. विशेष बाब म्हणजे, राजकीय वर्तुळात अतितटीच्या ठरलेल्या इसरूळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतिश भुतेकर व उदयनगर (उंद्री) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसचे मनोज लाहुडकर हे प्रचंड मताधिक्क्याने निवडून आलेले आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ९१ सरपंच निवडून आल्याचा दावा जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी केला आहे. सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघातील ५६ पैकी ४० जागांवर आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे नेतृत्व मानणारे सरपंच निवडून आल्याचा दावादेखील नाझेर काझी यांनी केलेला आहे. तर चिखली विधानसभा मतदारसंघातील २५ गावांत काँग्रेसचे नेतृत्व मानणारे सरपंच निवडून आल्याचा दावा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. राहुलभाऊ बोंद्रे यांनी केलेला आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले होते, आज त्याचा निकाल जाहीर झाला. राज्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर सरपंचपदी भाजपचे उमेदवार निवडून आल्याचा दावा भाजपने केला असला तरी, ताज्या आकडेवारीनुसार, १८७३ ठिकाणी भाजपचे सरपंच निवडून आले आहेत. तर सर्वाधिक सरपंच हे ३१४६ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत. शिंदे गटाने ७०९ ठिकाणी तर ठाकरे गटाने १२२३ ठिकाणी आपले सरपंच निवडून आणले आहेत. काँग्रेसने १०८६ ठिकाणी आपले सरपंच निवडून आणले आहेत. इतर पक्षांनी आणि अपक्षांनी ९६७ ठिकाणी विजय मिळवला आहे. राज्यात एकूण ७ हजार ६८२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून, ६५ हजार ९१६ सदस्यपदासाठीदेखील ही निवडणूक झाली आहे. यंदा सरपंचपदाची थेट जनतेतून निवड झाली. या निवडणुका कोणत्याही राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्याने सर्वच राजकीय पक्ष आपणच क्रमांक एकवर असल्याचा दावा करत आहेत. विशेष म्हणजे, राज्यात १४ हजार ०२८ सदस्य हे बिनविरोध निवडून आले असून, ६९९ सरपंचदेखील बिनविरोध झालेले आहेत. या बिनविरोध सरपंचांपैकी ४९३ सरपंच हे महाविकास आघाडीचे नेतृत्व मानणारे आहे. तसेच, एकूण ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नाही. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात टाकळी खुर्द या गावात ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय झाल्यानंतर देवाच्या दर्शनासाठी जात असताना अचानक झालेल्या दगडफेकीत एका भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. धनराज श्रीराम माळी (वय ३२) असे या निधन झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. पराभूत झालेल्या झालेल्या पॅनलच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली व त्या दगडफेकीत धनराज माळी याचा मृत्यू झाल्याचा आरोप धनराज माळी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
ग्रामीण भागात काँग्रेसची पाळेमुळे आजही घट्ट आहेत, जनतेने काँग्रेस पक्षावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू. नागपूर जिल्ह्यात २३६ पैकी २०० ग्रामपंचायतींवर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असून भाजपला ३६ जागाही मिळाल्या नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावातही काँग्रेसचा विजय झाला आहे. भाजपा विजयाचे खोटे दावे असून दुस-याच्या घरी पोरगा झालातरी भाजपवाले लाडू वाटतात. विधानपरिषद निवडणुकापांसून भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची मालिका सुरू झाली असून नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आता ग्रामपंचायतमध्येही पराभव केला आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीतही भाजपाला धूळ चारून काँग्रेसच्या विजयाचा गुलाल उधळू, अशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
विदर्भ, कोकण सगळीकडे आमची सरसी झाली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, आमच्या युतीला दणदणीत विजय मिळाला आहे. राज्यात ३ हजार २९ ग्रामपंचायती आमच्या आल्यात आहेत. विदर्भ, कोकण सगळीकडे आमची सरसी झाली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
मतमोजणीनंतर येळगाव येथे राडा!
बुलढाण्यातील येळगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली. मात्र मतमोजणीनंतर विजयी व पराभूत झालेल्या गटांतील उमेदवारांमध्ये राडा झाला. यात पराभूत झालेल्या उमेदवारांकडून एकास मारहाण झाली. मतमोजणी होऊन दादाराव लवकर यांना ९ मतांनी विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र विरोधी गटाने पुनर्मोजणीचा अर्ज केल्याने पुन्हा मतमोजणी झाली. परंतु पुनर्मोजणीनंतरही निकालात कुठलाही फरक पडला नाही. इकडे मात्र पराभूत उमेदवारांच्या समर्थकांचा राग अनावर झाला. विजयी सरपंच दादा लवकर यांचे समर्थक पंजाबराव गडाख यांना पराभूत उमेदवार अशोक गडाख यांच्या भाच्याने बँकेच्या चौकात गाडी थांबवून मारहाण केल्याची माहिती आहे.
जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहराला लागून असलेल्या व तालुक्यातील सर्वात मोठी आणि श्रीमंत ग्रामपंचायत असलेल्या सावळा-सुंदरखेडमधील लढत प्रारंभीपासूनच अटीतटीची ठरली. सरपंचपदासाठी तब्बल १० उमेदवार रिंगणात उतरले होते. मावळत्या सरपंच अपर्णा राजेश चव्हाण (१५८४) यांनीच पुन्हा बाजी मारली. निकटचे प्रतिस्पर्धी प्रतीक दिलीप जाधव (१४८८) व संतोष राजपूत (१४४७) यांनी तुल्यबळ लढत दिली. प्रतीक जाधव यांनी अर्ज दिल्यावर फेरमोजणी घेण्यात आली असता निकाल कायम राहिला.
– ग्रामपंचायत निवडणुकीत ठळक घडामोडी –
– बुलढाणा तालुक्यातील चिखला ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पॅनलने काँग्रेसचा धुव्वा उडवत, एकतर्फी दणदणीत विजय मिळविला. या ठिकाणी विदर्भ वंजारी समाज सेवा परिषदेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र वाघ यांचे सुपुत्र अॅड. पराग वाघ यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार विजय रमेश वाघ यांच्यावर २८५ मतांनी विजय संपादन केला. विशेष म्हणजे, सदस्यपदाच्या सातही जागा भाजपनेच पटकावल्या!
– माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या समर्थ ग्रामविकास पॅनलचा मोठा पराभव झाला. तर सतिश घाडगे पाटील यांच्या समृद्धी ग्रामविकास पॅनलने माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या पाथरवाला गावात दणदणीत विजय मिळवला आहे.
– ग्रामपंचायत निवडणुकीत सिंदखेडराजा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व
– गुंज, पिंपळगाव ठोसरमध्ये राष्ट्रवादी, रताळीमध्ये शिंदे गट विजयी
– उदयनगर (उंद्री) ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाचे काँग्रेसचे उमेदवार मनोज लाहुडकर १३०० मतांनी विजयी
– अहमदनगरच्या पारनेर-नगर मतदारसंघात आमदार निलेश लंकेंची बाजी, १६ पैकी १३ ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात
– परळीत पंकजा मुंडेंना धक्का – ६४८ मतांनी नाथरा ग्रामपंचायत नाथरा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे अभय मुंडे विजयी
– सख्ख्या मावस जावांना एकसमान मते, चिठ्ठी काढून मिळणार कौल; गावाकर्यांचा कौल दोन्ही जावाना समान;औरंगाबाद जिल्ह्यातील गराडा गावातील निवडणूक निकाल
– पुणे जिल्ह्यात अजित दादांची सरशी, चंद्रकांत पाटलांना दणका
– हभप.इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई गावगाडा हाकणार, निळवंडे सरपंचपदाच्या निवडणुकीत मिळाला दणदणीत विजय
– आ. बच्चू कडू यांचे बंधू झाले सरपंच, १२३४ मतांनी विजयी
– राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर या काका-पुतण्यातील सत्ता संघर्ष ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील पहावयास मिळाला. नवगण राजुरी जिल्हा परिषद सर्कलमधील नवगण राजुरी या होमपीचवर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचा धुव्वा उडवत संदीप क्षीरसागर यांनी काकाला धोबीपछाड दिली.
– जामनेर तालुक्यात टाकळी खुर्द या गावात ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय झाल्यानंतर देवाच्या दर्शनासाठी जात असताना अचानक झालेल्या दगडफेकीत एका भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. धनराज श्रीराम माळी (वय ३२) असे या निधन झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. पराभूत झालेल्या झालेल्या पॅनलच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली व त्या दगडफेकीत धनराज माळी याचा मृत्यू झाल्याचा आरोप धनराज माळी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
– मंत्री कन्या विजयी – मुख्यमंत्री शिंदे – फडणवीस सरकारमधील मंत्री संदीपान भुमरे यांच्या कन्या सौ. प्रेरणा प्रतापसिंह पंडित (भुमरे) या दैठण (ता. गेवराई, जि. बीड) ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पॅनलकडून सरपंचपदासाठी विजयी.
– खामगाव ग्रामपंचायत निवडणूक – १६ पैकी ८ सरपंच पदावर काँग्रेसचा दावा, येळगाव ग्रामपंचायतीची नव्याने मतमोजणी झाल्यानंतर किरकोळ हाणामारी. पोलिसांनी जमावाला पांगविले. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार.
– गोपीचंद पडळकरांच्या मातोश्री आणि कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासूबाई बनल्या सरपंच.
– बुलढाणा येथील सुंदरखेड ग्रामपंचायतीत सरपंचपदी अर्पणा राजेश चव्हाण यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत माजी सभापती दिलीप जाधव व संतोष राजपूत या पॅनलमध्ये जोरदार लढत झाली आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीत जाधव यांचे सुपुत्र प्रतिक जाधव व संतोष राजपूत दोघेही पराभूत झाले आहेत.
– चिखली तालुक्यात अत्यंत चुरशीच्या व राजकीय नेत्यांचे लक्ष लागलेल्या इसरूळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतिश अण्णाराव भुतेकर हे सरपंचपदी विजयी झाले आहेत. शिवसेनेचे संतोष भुतेकर यांचा त्यांनी ३९३ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यातून खेचून घेतली आहे.
– बुलढाणा तालुक्यात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे वर्चस्व असल्याचे दिसून आले असून, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना राजकीय धक्का बसला आहे. शिंदे गटाला १० पैकी एक जागा मिळाली असून, ४ जागा भाजप तर ५ जागा महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत.
– श्रीगोंद्याचे आमदार तथा माजी मंत्री हभप. बबनराव पाचपुते यांच्या मुलाचा पराभव
– बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली पार्तुडा ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे रणजित गंगतिरे सरपंचपदी ७३० मतांनी विजयी. हा भाजपाला मोठा धक्का आहे, याठिकाणी भाजपने पूर्ण ताकद लावली होती.
– बुलढाणा तालुक्यातील गिरडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे तालुका प्रमुख धनंजय बारोटे पराभूत तर याठिकाणी उद्धव ठाकरे गटाच्या सुनीता गायकवाड विजयी झाल्या आहे.
– बुलढाणा जिल्ह्यातील २७९ ग्रामपंचायतीपैकी २५१ ग्रामपंचायतीसाठी काल मतदान झाले. २१ ग्रामपंचायत ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
– राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे सख्खे मेहुणे बाळासाहेब ओमासे बेडग ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत.
– शेगाव, जळगाव जामोद,संग्रामपूर तालुक्यात खासदार राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रभाव पडला आहे. तिन्ही तालुक्यात अनेक ठिकाणी काँग्रेस आघाडीवर आहे.
– विखे आणि थोरात गटाला शह, इंदुरीकर महाराजांच्या सासू सरपंच.
– परतूरमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष करताना पोलिसांचा लाठीचार्ज
– जळगाव जामनेरमधील टाकळी खुर्द गावातून धक्कादायक बातमी. विजयी मिरवणुकीवरून भाजपच्या दोन गटात हाणामारी. या हाणामारीत धनराज माळी या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
– जालना जिल्ह्यातील जवखेडा गावचा निकाल हाती आले आहे. रावसाहेब दानवेंची भावजय सुमन दानवे विजयी झाल्या आहेत. रावसाहेब दानवेंच्या गावात ३० वर्षांनंतर निवडणूक होत आहे.
– भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे जन्मगाव असलेल्या नाथरामध्ये पंकजा मुंडे यांना जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि धनजंय आणि पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ अभय मुंडे हे विजयी झाले आहेत.
———————-