ChikhaliVidharbha

मंत्री चंद्रकांत पाटलांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन

चिखली (शहर प्रतिनिधी) – महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी संतापजनक वक्तव्य केल्याप्रकरणी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, अशा इशारा चिखली तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना रिपब्लिकन सेनेच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनात नमूद आहे, की महाराष्ट्रातील महापुरुषांचा एकेरी भाषेत उल्लेख करणे, त्यांच्याविषयी अपशब्द बोलून अपमान करणे व नंतर माफी मागून मोकळे होणे, अशी नीच प्रथा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील व देशातील काही राजकारणी महापुरुषांच्या विषयी बोलतांना मागचा पुढचा विचार न करता उचलली जीभ लावली टाळूला असेच घडत आहे. छिंदम, राज्यपाल, त्रिवेदी नंतर महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अकलेचे तारे तोडत सांगितले की, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू करण्यासाठी भीक मागितली. असे बिनडोकपणाचे वक्तव्य केल्याने समाजमन दुखावल्या गेले. सतत महापुरुषांचा होणारा अपमान असह्य होत चालला असून, राग अनावर झाल्याने काही तरुणांनी चंद्रकांत पाटलाच्या अंगावर शाही फेकून निषेध केल्याने त्या तरुणांवर हत्येच्या प्रयत्नासह अतिशय गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. एका साधारण मंत्र्याच्या अंगावर शाही फेकली तर गुन्हे दाखल होतात, तर ज्या महापुरुषांच्या कार्याने देश प्रभावित झाला, त्यांच्या कर्तृत्वाची छाप जगभर पडली, अशा महापुरुषांचा अपमान करणार्‍या चंद्रकांत पाटलावर तत्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा रिपब्लिकन सेनेच्यावतीने जिल्हाभर आंदोलन छेडू, असा खणखणीत इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. हे निवेदन देतेवेळी रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजयकांत गवई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे, जिल्हा महासचिव सलीमभाई, जिल्हाध्यक्ष पेंटर संघटना सुरेशभाऊ इंगळे, चिखली शहर अध्यक्ष सुनील सोळंके, चिखली शहर उपाध्यक्ष सतीश पवार, अनिल चव्हाण, दीपक तायडे, शेख दानिश, विजय इंगळे, गौतम इंगळे, अनिल चव्हाण, सौरभ बावस्कर रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!