Breaking newsHead linesMaharashtraMetro CityMumbai

अनिल देशमुखांना जामीन; पण आणखी १० दिवस तुरुंगातच!

मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांना आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसदिनीच जामीन मंजूर झाला होता. परंतु, सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगून, १० दिवसांकरिता स्थगिती मागितली आणि जामीन मिळूनही देशमुख यांना कारागृहाबाहेर येता आले नाही. ‘सीबीआयच्या मागणीनुसार जामीन मंजूर झाल्याच्या निर्णयाला १० दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे, मात्र स्थगिती मिळाली असली तरी सर्वोच्च न्यायालयामध्येही उच्च न्यायालयाचा निकाल कायम राहिल, असा विश्वासही देशमुख यांच्या वकिलांनी व्यक्त केला.

भ्रष्टाचार आणि १०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेले अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे. काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचलनालयाने दाखल केलेल्या गुन्ह्यांप्रकरणी हा जामीन मिळाला. मात्र, देशमुखांना जामीन मंजूर होताच, पुढच्याचक्षणी त्यांच्या जामिनाला १० दिवसांची स्थगितीसुद्धा देण्यात आली. कारण, सीबीआयने या जामिनाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. यासाठी १० दिवसांची स्थगिती या निर्णयावर द्यावी, अशी मागणी केली. दरम्यान, सीबीआयच्या विनंती मान देऊन न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना एक लाख रुपयांच्या बॉन्डसह जामीन दिला आहे.

१०० कोटी रुपयांच्या वसुलीप्रकरणी अनिल देशमुख यांच्यावर आरोप आहे. ईडीने अनिल देशमुखांना अटक केली होती. याच प्रकरणात देशमुखांना याआधी जामीन मंजूर झालेला आहे. आता सीबीआय प्रकरणातही त्यांना जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्या जामिनावर सुनावणी झाली. न्यायाधीश एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे त्यांच्या जामीनअर्जावर युक्तिवाद झाला आणि अखेर देशमुखांना जामीन मंजूर झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस आहे. याचदिवशी अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला. परंतु, या आनंदावर सीबीआयने विरजण पाडले. आणि, जामिनाच्या निर्णयाला दहा दिवस स्थगिती मिळवली.

अनिल देशमुख हे हृदयविकाराने त्रस्त आहेत. खासगी रुग्णालयात उपचार करायला मिळावेत, अशी मागणी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. कोर्टाने त्यांची विनंती मान्य केली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आता न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने अनिल देशमुख यांना आपल्या घरी परत जाता येणार आहे. तब्बल वर्षभरापासून देशमुख हे तुरुंगात आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी केलेल्या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ईडीने त्यांना अटक करत त्यांची रवानगी कारागृहात केली होती. तेव्हापासून अनिल देशमुख तुरुंगाबाहेर कधी देणार, याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते डोळे लावून बसले होते. मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना जामीन दिल्याच्या निर्णयाला सीबीआयने आव्हान दिल् आहे. सीबीआय आता या विषयी पुढे दाद मागणार आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी आता १० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जामिनाचा आदेश स्थगित करावा, अशी मागणी सीबीआयने केल्याची माहिती देशमुखांचे वकील अनिकेत कदम यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!