कर्जत (प्रतिनिधी) – चापडगावचे (ता.कर्जत) ग्रामदैवत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा कलश रोहण समारंभ हभप गोविंद महाराज शिंदे यांच्याहस्ते तर हभप सुरेश महाराज बेद्रे यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी मंदिरावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. हा सोहळा पाहण्यासाठी चापडगाव आणि परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
ग्रामदैवत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यानिम्मित चापडगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हभप नागनाथ महाराज गोरे, सुरेश महाराज बेद्रे, रवींद्र महाराज पोटे, नितीन महाराज गोडसे, सपनाताई साखरे, वैभव माळवदे आणि गणेश महाराज वारंगे यांचे विठ्ठल भजनी मंडळाच्यावतीने किर्तन व हरीजागर पार पडले. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने सात दिवस स्नेहभोजन दिले गेले. गुरुवारी गावातील सासुरवाशीण लेकींना आग्रहाचे निमंत्रण देत त्यांना गावी बोलाविण्यात आले होते. त्यांना मान देत त्यांच्या हस्ते मंदिरावरील कलशाची मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीत वारकरी दिंडी, हलगी, सुमधुर बँडपथक आणि डीजे आदी सहभागी झाले होते. काल्याच्या किर्तनानंतर कलशाची विधिवत पूजा करीत तो मंदिरावर चढविण्यात आला. कलशावर प्रकाशकाका शिंदे युवामंच आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी माजीमंत्री आ. प्रा राम शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, माजी जि प सदस्य प्रवीण घुले, जेष्ठ नेते अॅड कैलास शेवाळे, बापूसाहेब नेटके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, अशोक खेडकर, दादा सोनमाळी, गणेश क्षीरसागर, पप्पू धोदाड, अशोक देवकर, औदुंबर निंबाळकर आदी उपस्थित होते.