शाईफेक प्रकरणात पोलिस, सरकारचे पाय आणखी खोलात!
– पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारालाही त्रास, राज्यभरातील पत्रकार, संघटना संतापल्या
– मंत्री पाटील यांनी दिले पवार कुटुंबाला आव्हान – म्हणे, मी तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढणार!
पुणे (विशेष प्रतिनिधी) – महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केले म्हणून, समता सैनिक दल व आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकून निषेध केला होता. या तीनही तरुणांवर हत्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल केल्यावरून आंबेडकरी समुदयात तीव्र संताप निर्माण झालेला आहे. तसेच, या शाईफेकीचा व्हिडिओ शूट केला म्हणून पत्रकार गोविंद वाकडे यांनादेखील पोलिस त्रास देत आहेत, त्याबद्दल राज्यभरातील पत्रकारांतही तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे. दुसरीकडे, या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचे काम मंत्री चंद्रकात पाटील यांनी केले असून, शाईफेकीच्या घटनेमागे शरद पवारांचा हात असल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. तसेच, मी पवारांना डायरेक्ट चॅलेंज करतो की, तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढणार, असे आव्हानदेखील मंत्री पाटील यांनी दिले आहे.
शाईफेक प्रकरणी पत्रकाराला व्हिडिओचा परफेक्ट अँगल कसा सापडला असे सांगून, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका पत्रकारावरदेखील कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर या शाईफेक प्रकरणात पत्रकार गोविंद वाकडे यांना पोलिस राजकीय दबावापोटी त्रास देत असल्याचे उघडकीस आले आहे. पत्रकारांच्या मुस्कटदाबीविरोधात पिंपरी – चिंचवडच्या पत्रकारांनी निषेध आंदोलन केले. तसेच, राज्यभर सर्व पत्रकार संघटना व पत्रकारदेखील मंत्री पाटील व राज्य सरकारच्या सूडाच्या राजकारणाचा तीव्र निषेध करत आहेत. मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती ही पत्रकार वाकडे यांच्यासोबत असल्याची भूमिका अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी घेतली आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणार्या तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मनोज भास्कर घरबडे (समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इजगज (समता सैनिक दल सदस्य) आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय धर्मा ओव्हाळ या तिघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय आहे. त्यांच्यावर भारतीय दंडविधानाच्या ३०७, ३५३, २९४, ५००, ५०१, १२० (ब) ३४ कलमांसह क्रिमिनल अमेंन्डमेंन्ट अॅक्ट कलम ७, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७(१) आणि १३५ अन्वये पोलिसांनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे राज्यातील संपूर्ण आंबेडकरी समुदयातून राज्य सरकारविषयी तीव्र संतापाची लाट निर्माण झालेली आहे. शाईफेक प्रकरणातील तिघांनाही आज कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी त्यांच्या बचावासाठी शेकडो वकील पुढे आले होते. कोर्टात जोरदार युक्तिवादही करण्यात आला. न्यायालयाने तिघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तिघांनाही कोर्टात घेऊन जाताना कोर्टाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला होता. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून नये याची पोलिसांनी पुरेपूर काळजी घेतली होती.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तिघांवरही ३०७ (हत्येचा प्रयत्न) सारखा गंभीर गुन्हा दाखल करून राजकीय द्वेषातून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला गेल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी केला. या तिघांनी देखील ३०७ सारखा गुन्हा केला नाही, परंतु, त्यांच्यावर हा गुन्हा दाखल केला गेला. पोलिस यंत्रणांवर राजकीय दबाव आहे. त्यामुळे त्यांनी विचारपूर्वक हा गुन्हा दाखल केला. परंतु, याविरोधात आम्ही हायकोर्टात जावू आणि दाद मागू, असे त्यांच्या वकिलांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले.
१० पोलिस अधिकारी, कर्मचारी निलंबीत!
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकप्रकरणी १० पोलिसांचे निलंबन करण्यात आले असून, यामध्ये ७ पोलिस कर्मचारी तर ३ पोलिस अधिकार्यांचा समावेश आहे. चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली होती. त्याचा ठपका या पोलिसांवर ठेवण्यात आला आहे. निलंबन झालेल्यांमध्ये पोलिस निरीक्षक सतीश नांदूरकर (गुन्हे शाखा, युनिट २), पोलिस उपनिरीक्षक प्रदीपसिंग समाधान सिसोदे (गुन्हे शाखा), गणेश दत्तू माने (चिंचवड पो.स्टेशन), एएसआय भाऊसाहेब मुरलीधर सरोदे (चिंचवड पो.स्टेशन), एएसआय दीपक महादेव खरात (गुन्हे शाखा), पो. हवालदार प्रमोद सूर्यकांत वेताळ (गुन्हे शाखा), पो.नाईक देवा शिवाजी राऊत (गुन्हे शाखा), पो. नाईक सागर दशरथ अवसरे (गुन्हे शाखा), महिला पो. कांचन प्रशांत घवले (चिंचवड पो.स्टेशन), महिला पो. प्रियांका भैय्यालाल गुजर (मुख्यालय) यांचा समावेश आहे. या निलंबनावरूनही पोलिस दलात संताप व्यक्त होत आहे.
——————