समृद्धी महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते उद्घाटन
– दुपारी दोन वाजता महामार्ग वाहतुकीसाठी खुला होणार!
नागपूर (जिल्हा प्रतिनिधी) – बहुचर्चित समृद्धी महामार्गावरील ५२० किलोमीटरच्या नागपूर – शिर्डी टप्प्याचे उद्घाटन आज, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते नागपूर येथे करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर लगेचच दुपारी २ वाजता हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. समृद्धीचा आरंभबिंदू असलेल्या शिवमडका येथे पंतप्रधान मोदी सकाळी १०.४५ वाजता पोहोचतील. त्यानंतर आरंभबिंदूपासून ते पुढे वायफळ टोल नाक्यादरम्यान १० किमी प्रवास करतील. पंतप्रधानांच्या हस्ते ११ वाजता फित कापून समृद्धीचे उद्घाटन करण्यात येईल. त्यानंतर तात्काळ ते पुढील कार्यक्रमासाठी मिहान, एम्सच्या दिशेने प्रस्थान करतील. उद्घाटनानंतर दुपारी २ वाजल्यापासून नागपूर – शिर्डी महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होईल, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’तील वरिष्ठ अधिकार्याने दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर रोजी नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी ५२० किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी पंतप्रधान मोदी नागपूर मेट्रोमधून प्रवास करणार असून झिरो माईल्स ते खापरी मेट्रो स्टेशनपर्यंत जातील. यावेळी ते झिरो माईल पॉंईटपासून समृद्धी महामार्ग ते वायफळपर्यंतच्या सुमारे १० किमीची पाहणी करणार आहेत. या प्रवासासाठी त्यांना १५ मिनिटांचा कालावधी लागेल.
दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी पूर्ण झाली. पण, त्याआधी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही सवाल केलेत. महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादावरून आधी भूमिका मांडा. नंतर उद्घाटन करा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरे म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अरेरावीबद्दल तुम्ही बोललंचं पाहिजे. महाराष्ट्र तुमच्या सीमाप्रश्नावरील भूमिकेची वाट बघतोय. मोठ्या महामार्गाचे उद्घाटन करत असताना कर्नाटक सीमावादावर तुम्ही काय बोलणार आहात ते आधी बोला नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने असलेल्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन करा, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले. दुसरीकडे, समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाआधीच इकडे औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाने उद्घाटन केले. राज्यपाल कोश्यारींवर कारवाई होत नसल्याने मराठा क्रांती मोर्चाने आपला रोष व्यक्त केला.
दरम्यान, पंतप्रधानांसमवेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह केंद्रीय आणि राज्याचे मंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. मुंबई – नागपूर दरम्यानच्या ७०१ किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. त्यामुळे ‘एमएसआरडीसी’ने पाच टप्प्यात समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.
असे आहे पंतप्रधान मोदींचे कार्यक्रम वेळापत्रक
सकाळी ९.२५ वाजता : नागपूर विमानतळावर आगमन
सकाळी ९.३० वाजता : नागपूर विमानतळावरून रस्त्याने प्रयाण
सकाळी ९.४० वाजता : नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार
सकाळी ९.४५ वाजता : वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवणार
सकाळी १० वाजता : झिरो माईल फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशनला पोहोचणार
सकाळी १०.२० वाजता : खापरी मेट्रो स्टेशनला पोहोचणार. खापरी ते ऑटोमोटिव्ह चौक, प्रजापती नगर ते लोकमान्य नगर या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाईल.
सकाळी १०.४५ वाजता : समृद्धी महामार्गाच्या सुरुवातीच्या ठिकाणी पोहोचणार. यावेळी १० किलोमीटर सायकल चालवणार
सकाळी ११.१५ वाजता : मिहान कॅम्पस स्टेटस एम्सचे उद्घाटन
सकाळी ११.३० वाजता : एम्स मंदिराच्या मैदानातील मेळाव्याला संबोधन
दुपारी १२.३५ वाजता : सभेच्या ठिकाणाहून निघून विमानतळाकडे प्रयाण
दुपारी १२.५५ वाजता : नागपूर विमानतळावरून गोव्यासाठी उड्डाण