Breaking newsHead linesMaharashtraNagpurPoliticsVidharbhaWorld update

शॉर्टकटचे राजकारण करणारे नेते देशाचे सर्वात मोठे शत्रू : नरेंद्र मोदी

– मोदींकडून फडणवीस-शिंदे सरकारचे यांचे तोंडभरून कौतुक

नागपूर (विशेष प्रतिनिधी) – ‘एका विकृतीपासून सावधान करतो, शॉर्टकटचे राजकारण करू नका. राजकीय स्वार्थासाठी देशाचे पैसे लुटले जात आहे. ही विकृती करदात्यांचे पैसे लुटण्याची आहे. शॉर्टकट वापरणारे राजकीय पक्ष, नेते हे देशाच्या करदात्याचे शत्रू आहे. फक्त खोटी आश्वासने देऊन त्यांना फक्त सरकार सरकारमध्ये यायचे असते. असे राजकीय पक्ष देश कधीच बनवू शकत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय विरोधकांना डिवचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पार पडले. याप्रसंगी मोदी बोलत होते.

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो, नागपूर रेल्वे स्टेशन, वंदे भारत एक्स्प्रेस, एम्स रुग्णालय सारख्या विविध प्रकल्पांचेदेखील लोकार्पण केले. नागपूर ते मुंबई असा ७०१ किलोमीटर लांबीच्या या महामार्गावरील नागपूर ते शिर्डी हा टप्प्या सर्वसामान्यांना आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला. याप्रसंगी विचारपीठावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शिंदे – फडणवीस सरकारचे जोरदार कौतुक केले. आपल्या भाषणाला मराठीतून सुरूवात करताना मोदी म्हणाले, की ‘आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभकाम करताना आपण प्रथम गणेशपूजन करतो. आज नागपुरात आहोत तर टेकडीच्या गणपती बाप्पाला माझे वंदन. ११ डिसेंबरचा आजचा दिवस संकष्टी चतुर्थीचा पवित्र दिवस आहे,’ अशी पंतप्रधानांनी भाषणाची सुरुवात करताच सर्वांनी टाळ्यांनी त्यांना दाद दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी पायाभूत सुविधांची उभारणी करताना मानवी संवेदनांचा विचार झाला पाहिजे, असे सांगितले. यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील गोसीखुर्द धरण प्रकल्पाचे उदाहरण दिले. समृद्धी महामार्गासह आज उद्घाटन झालेल्या ११ प्रकल्पांना एकप्रकारचा ह्युमन टच आहे. पण अनेकदा पायाभूत सुविधांची उभारण करताना मानवी संवेदनांचा विचार केला जात नाही. त्यामुळे जनतेला मोठे नुकसान सोसावे लागते. महाराष्ट्रातील गोसीखुर्द प्रकल्प हे त्याचे उदाहरण आहे. या धरणाची पायाभरणी ३० ते ३५ वर्षांपूर्वी झाली. त्यावेळी या धरणाच्या उभारणीसाठी ४०० कोटींचा खर्च अपेक्षित होता. पण असंवेदनशील कार्यपद्धतीमुळे या धरणाचे काम अनेक वर्षे रखडले. आता या धरणाचा खर्च १८ हजार कोटींवर जाऊन पोहोचला आहे. आता ३० वर्षानंतर हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या स्थितीत आहे. पण महाराष्ट्रात २०१७ पासून डबल इंजिन सरकार आल्यापासून या धरणाचे काम वेगाने झाले. संबंधित समस्या निकाली काढण्यात आल्या. त्यामुळे महाराष्ट्रासाठी डबल इंजिन सरकार किती फायदेशीर आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचा उल्लेख केला. एका बाजूला शॉर्टकर्टचे राजकारण आणि दुसरीकडे शाश्वत विकास आहे. मला आनंद आहे की, शाश्वत विकासाला आज देशातील जनतेचा पाठिंबा मिळत आहे. गुजरातमधील निवडणुकांचे निकाल हे शाश्वत विकासाला मिळत असलेल्या पाठिंब्याचे उदाहरण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.


पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुढच्या कार्यक्रमाचे आमंत्रण

आता रोड कनेक्टिव्हिटी आहे. रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे. लवकरच हायस्पीड रेल्वे पण होणार आहे. त्याच बरोबर पुढच्या एका महिन्यात नागपूर एअरपोर्टच्या भूमिपूजनासाठीही आम्ही तुम्हाला बोलावणार आहोत, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या कार्यक्रमाचे निमंत्रणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. २० वर्षांपूर्वी नागपूर ते मुंबई महामार्ग व्हावा, असे स्वप्न पाहिले होते. पण आता ते पूर्ण झाले. मोदीजी हे केवळ आपल्या सहकार्यामुळे हे स्वप्न पूर्ण झाले. महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने मी आपले आभार मानतो, असे फडणवीस म्हणालेत. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवरही फडणवीस बोललेत. जेव्हा समृद्धी महामार्गाचा विचार झाला तेव्हा फक्त एका व्यक्तीचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. ती व्यक्ती म्हणजे एकनाथ शिंदे. त्यांना विश्वास होता की, मी महाराष्ट्राच्या हितासाठी पाऊल उचलतोय आणि ते कार्य लवकरात लवकर आणि चांगल्या प्रकारे पूर्ण होईल, असेही फडणवीसांनी सांगितले.


हा समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून १४ जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे, हे विशेष. त्यातही मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत अविकसित राहिलेले हे दोन भूप्रदेश महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!