Breaking newsHead linesMaharashtraNagpurPolitical NewsPoliticsWorld update

मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे ‘स्टेअरिंग’ फडणवीसांच्या हाती!

 

– पंतप्रधानांच्याहस्ते ११ डिसेंबरला पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

पुरूषाेत्तम सांगळे

नागपूर/मुंबई – नागपूर – मुंबई या दोन मोठ्या शहरांना जोडणार्‍या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. नागपूरमध्ये ११ डिसेंबररोजी लोकार्पण सोहळा पार पडणार असून, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्याच दिवशी नागपुरच्या विस्तारीत मेट्रो प्रकल्पाचेसुद्धा लोकार्पण केले जाणार असून, राज्य सरकारकडून या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. दरम्यान, या समृद्धी महामार्गाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘टेस्ट राईड’ केली. नागपूरहून हा ताफा शिर्डीच्या दिशेने निघाला व साईबाबांच्या शिर्डीत जाऊन पोहोचला. एकाच गाडीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसलेले होते, तर गाडीचे ‘स्टेअरिंग’ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती होते. त्यामुळे सरकारचे स्टेअरिंगदेखील फडणवीस यांच्याच हाती असल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली होती.

नागपूर ते मुंबई व्हाया मराठवाडा जोडणारा हा प्रकल्प तब्बल ५५ हजार ३३५ कोटी रूपयांचा असून, डोंगरदर्‍यांमधून महामार्गाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामूळे नागपुर ते मुंबई पोहचण्यासाठी लागणार्‍या वेळात बचत होणार असून, ७०१ किलोमीटरचा हा समृद्धी महामार्ग असणार आहे. त्यापैकी नागपूर – शिर्डी या पहिल्या टप्याचे आता काम पूर्ण झाले आहे. ५२० किलोमीटरचा प्रवासाचा समृद्धी महामार्ग ११ डिसेंबर रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.

दरम्यान, नागपूर-शिर्डी या मार्गाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी एकत्रित स्वतः मर्सिडिज गाडी चालवून पाहणी केली. दोघांनीही आलटून पालटून गाडी चालवली. तत्पूर्वी, हा प्रवास सुरू करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस कार चालवत आहेत. त्याचा आनंद वाटतो. हा वेगळा आनंद आहे आणि मोठा आनंद आहे. मीही कार चालवणार आहे. मी अगोदर ट्रायल घेतली आहे. १२०च्या स्पीडने आम्ही कार चालवणार आहोत. नियम पाळूनच कार चालवणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. लोकांसाठीच रस्ता उघडला जात आहे. त्यापूर्वी आम्ही त्याची पाहणी करणार आहोत. या महामार्गामुळे जनतेला वेगाने प्रवास करता येणार आहे. या रस्त्यावरील वेग जसा वाढणार आहे, त्याच वेगाने सरकार काम करत आहे. यापुढेही वेगाने काम सुरू राहील. उद्घाटन झाल्यावर आणखी वेगाने सुरू राहील, असे शिंदे यांनी सांगितले. तर, हा महामार्ग खुला झाल्यानंतर विदर्भ-मराठवाड्याचा प्रचंड विकास झालेला पाहायला मिळणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. समृद्धी महामार्ग विदर्भाच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी पाहणी केली आहे. त्यामुळे यावेळी मी टेस्ट राईडचा आनंद घेतोय, असेही ते म्हणाले.

टेस्ट राईडवर निघण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समृद्धी मार्गाच्या नागपूरकडील झिरो माईल्स (महामार्गाचे सुरुवातीचे ठिकाण) येथून ते प्रवासाला सुरुवात केली. नागपूर ते शिर्डी पर्यंतचा 521 किमीचा प्रवास ते पूर्ण करणार आहेत. नियोजित दौऱ्यानुसार, आज सायंकाळी पाच वाजता ते शिर्डी येथे पोहोचतील. त्यानंतर शिर्डी विमानतळावरून मुख्यमंत्री नवी दिल्लीकडे प्रयाण करणार आहे.  समृद्धी महामार्ग जाणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात येत आहे.


वन्यजीवांचे संरक्षण, ११ लाख ३१ हजार झाडांची होणार लागवड

समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पात वन्यजीव संरक्षणासाठी एकूण ८० बांधकामे प्रस्तावित केले आहे. त्याची सरचना वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. वन्यजीवांच्या वावर असलेल्या ठिकाणी ध्वनीरोधक ठिकाण तयार केले आहे. तर आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंतीची उभारणी केली असल्याचे एमएसआरडीसीने सांगितले आहे. तसेच, प्रकल्पाच्या बांधकामामध्ये येणारी २ लाख ३६ हजार झाडे बाधीत होत असल्याने समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा ११ लाख ३१ हजार झाडे लावण्यात येणार आहे. संपूर्ण प्रकल्पाच्या हद्दीत झाडे लावणे, सुशोभिकरण करने, सिंचन व्यवस्था करने त्याशिवाय वृक्ष लागवडीची ५ वर्ष देखभाल दुरूस्ती करण्याचे कामसुद्धा केले जाणार आहे.


असा आहे महामार्ग

– लांबी ७०१ किलोमीटर
– खर्च – ५५ हजार ३३५ कोटी
– मार्गिका – ३ अधिक ३
– वाहन वेगमर्यादा – १५० किमी प्रतितास (डोंगराळ भागात १२० किमी)
– पहिला टप्पा – ५२० किलोमीटर
– रस्त्यांची रुंदी – १२० मीटर (डोंगराळ भागात ९० मी)
– इंटरचेंज – २४
– रस्तालगतचे नवनगरे – १८
– मोठे पुल – ३३
– लहान पुल – २७४
– बोगदे – ६
– रेल्वे ओव्हर ब्रीज – ८
– फ्लाय ओव्हर – ६५
– कल्हर्ट – ६७२
– मार्गक्रमण – १० जिल्हे, २६ तालुके, २९२ गावे


समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ११ डिसेंबरची तारीख मिळाली आहे. त्याप्रमाणे लोकार्पणानंतर नागपूर – शिर्डी पहिला टप्पा समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे.

– राधेश्याम मोपलवार, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!